पुणे – बाणेर येथील उच्चभ्रू वस्तीत मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. यावेळी तीन तरुणींची सुटका केली असून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. के. बी. फुंग्रेओ ऊर्फ माया (वय 29, मूळ मणिपूर) आणि नीतू रोषा या दोन महिलांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
बाणेरमधील श्रौफ सुहाना या सोसायटीतील “आराया स्पा अँड सलून’ या मसाज सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर सापळा टाकला असता हा प्रकार समोर आला.
तीनही तरुणी मिझोराम, मनिपूर आणि मेघालय राज्यांतील आहेत. आरोपींनी त्यांना पैशांचे आमिष दाखवून पुण्यात आणले होते. त्यानंतर मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी अधिक तपास चतु:शृंगी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त(गुन्हे) बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस हवालदार राजेंद्र कुमावत, संतोष भांडवलकर, राजश्री मोहीते, पोलीस नाईक अण्णा माने, मनिषा पुकाळे यांच्या पथकाने केली.