लखनौ – गाजीयाबाद येथील वैशाली सेक्टर मधील महागुन माॅलच्या तळघरात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. येथे स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून पाच पुरुष आणि चार महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 13100 रुपयेही जप्त करण्यात आले आहेत. तर स्पा ऑपरेटर फरार आहे.
स्थानिक पोलिस अधिकारी निखिल चक्रवर्ती यांनी सांगितले की, महागून मॉलच्या तळघरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. याप्रकरणी पोलिसांना एक व्हिडिओही मिळाला होता. तक्रार आणि व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास केला. माहिती मिळताच कौशांबी आणि इंदिरापुरम पोलिसांनी संयुक्त कारवाई करत स्पा सेंटरवर छापा टाकला.
यादरम्यान दोन जोडपे आक्षेपार्ह अवस्थेत आढळले. या पथकाने घटनास्थळावरून नितीन (रा. मंडवली दिल्ली), रशीद अल्वी (रा. जुनी सीमापुरी दिल्ली), अजय कुमार (रा. सीमापुरी), कुणाल कुमार (रा. साहिबाबाद), अंकित (रा. न्यायखंड इंदिरापुरम) यांच्यासह चार महिलांना ताब्यात घेतले. स्पा सेंटरमध्ये दिल्ली, गाझियाबाद येथून ग्राहक येत असत. ऑपरेटर व्हॉट्सअॅपद्वारे ग्राहकांना कॉल करून बोलवत असल्याची माहिती उघड झाली आहे. ऑपरेटर जागेवर सापडला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरवर टाकलेल्या छाप्यात दिल्लीतील मुली सापडल्या आहेत. अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून ऑपरेटरने त्यांना येथे आणल्याचे चौकशीत मुलींनी सांगितले. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली असून अधिक तपास सुरु आहे.