जम्मू : काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्यानंतर सरकारकडून राज्यात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच हिंसाचार भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथील राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह शंभर जणांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली आहे. यात आता जम्मूच्या नेत्यांचाही समावेश करण्यात येत आहे. माजी मंत्री आणि डोगरा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष चौधरी लालसिंह यांनादेखील नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांना त्यांच्या गांधीनगर भागातील निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात आले असून घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून काश्मीरमधील लॅंडलाईन, इंटरनेट, मोबाईल फोन काही काळापुरते बंद ठेवण्यात आले आहेत. संचारबंदीचा आदेश लागू करण्यात आला असल्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याबरोबरच काही राजकीय नेते, कार्यकर्ते यांनाही अटक झाली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांना रविवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या नेत्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते सज्जाद लोन, इम्रान अन्सारी यांनाही अटक करण्यात आली आहे. या नेत्यांना सध्या हरिनिवास याठिकाणी ठेवण्यात आले आहे.