मुख्याधिकारी अमरनाथ दौऱ्यात अडकल्याने धनादेशावरच्या सहीचा खोळंबा
सातारा – सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे अमरनाथ दौऱ्यात अडकल्याने पालिका कर्मचाऱ्यांचा पगार लटकला आहे. जिल्हा प्रकल्प संचालकांनीही “वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याने पगार दहा तारखेवर जाण्याच्या शक्यतेमुळे कर्मचारी वैतागले आहेत.
सातारा पालिकेच्या वेगवेगळ्या बावीस विभागांमध्ये 545 कर्मचारी असून यामध्ये राज्य संवर्ग तसेच श्रेणीनिहाय प्रथम ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सातारा पालिकेतील विवादित 36 कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.
या आयोगात फरकासह चोवीस महिन्यांच्या मूळ पगारासह फरक आणि महागाई अदा करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पालिकेच्या मासिक वेतनाची तारीख पाचच्या पुढे सरकली आहे. बहुतांश चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे गृहकर्जाचे हफ्ते व इतर देणी यामुळे पगारासाठी लेखा विभागाच्या मागे एक तारखेपासून तगादा सुरु होतो. मात्र, जुलै पेड इन ऑगस्ट या महिन्याच्या प्रलंबित वेतनाची रडकथा वेगळीच आहे. लेखा विभागाने काढलेल्या पगाराच्या धनादेशावर मुख्याधिकाऱ्यांची सही नसल्याने पालिका कर्मचाऱ्यांचा पगार रखडला आहे.
धनादेशावर सही करण्यासाठी मुख्याधिकारी गोरे हे सूचनेनुसार साताऱ्यात उपलब्ध असून ते चक्क पालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांसमवेत अमरनाथच्या दौऱ्यावर असल्याचे वृत्त आहे. अडचणी आल्याने दौऱ्यातील पाहुण्यांचा वाढलेला मुक्काम पालिका कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या सहीशिवाय चेक वटणार नसल्याने पगार मिळण्याची प्रचंड अडचण झाली आहे. पहिल्याच आठवड्यात कर्मचाऱ्यांची ओढाताण सुरू झाल्याने कर्जाचे हप्ते फेडायचे कसे याची चिंता त्यांना पडली आहे. बुधवारी सकाळी पालिकेचे काही अधिकारी थेट जिल्हा प्रकल्प संचालक रवींद्र पवार यांना भेटून त्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केला. “मुख्याधिकारी गोरे गुरुवारी येतील.