देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
देहुरोड – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या शासकीय जमिनीवर बांधकाम करून राहणाऱ्या नऊ हजार 262 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळीत 1 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली होती. पुन्हा नव्याने रविवारी (दि. 15) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये एक हजार 344 मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. सात हजार 918 मतदार मतदानापासून वंचित झाल्याने 24 हजार 507 मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली.
देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने सर्वोच्च न्यायालय आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय जमिनीवर बांधकाम (अतिक्रमण) करून राहणाऱ्या नऊ हजार 262 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्याने 32 हजार 425 मतदार असलेल्या मतदार यादीत आता 23 हजार 163 मतदारांची प्रारुप मतदार यादी एक जुलै रोजी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर फेरतपासणी करीत हरकती नोंदवून पुन्हा मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी पुरावे सादर करण्यासाठी कागदपत्रे मागाविली होती.
त्यानुसार अंतिम मतदार यादी रविवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये 1344 मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे वार्ड क्रमांक एकमध्ये 1,032, 2 -2, 3 -0, 4 -0, 5-4, 6-2, 7-304 असे मतदार नव्याने सामाविष्ट करण्यात आले आहेत. वार्ड क्रमांक 3 व 4 वगळता, वार्ड क्रमांक 1 मध्ये सर्वात अधिक म्हणजे 1,032 मतदारांचे नाव सामाविष्ट करण्यात आली आहेत. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार असलेले वार्ड मतदार संख्या अनुक्रमे 1-5,385, 2-4,385, 3-69, 4- 3,254, 5-4,184, 6-4,692, 7-2,538.
रविवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादी नुसार सात हजार 918 मतदार मतदानापासून वंचित राहणार असल्याने त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर पडतील का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर आगामी तीन महिन्यांनी कॅंटोन्मेंट बोर्डाचे निवडणूक होणार आहे.
वार्डातील मतदार संख्यानुसार सर्वात कमी मतदार असलेला वार्ड क्रमांक 3 मध्ये 69 मतदार असून, सर्वाधिक वार्ड क्रमांक 1 मध्ये 5 हजार 385 मतदार आहेत. त्यामुळे निवडणूक कायदा आणि कॅंटोन्मेंट कायदा 2007 नुसार कॅंटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत वार्ड रचना करताना मतदार संख्येचा सरासरी समतोल साधणे आवश्यक असल्याने बोर्डाच्या निवडणुकीपूर्वी वार्ड रचना बदलावी लागणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता आणि निवडणुका यामुळे कुठलीही हालचाल करता येणार नसल्याने आगामी कॅंटोन्मेंट बोर्डाची निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.