एकवीरा देवी रस्त्यावर “घसरगुंडी’

कार्ला – वेहरगाव-कार्ला फाटा एकवीरा देवी रस्त्यावर वाहत असलेल्या पाण्यामुळे रस्त्यावरच शेवाळ निर्माण होऊन रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकीस्वार या रस्त्यावर पडले आहेत.

कार्ला-वेहरगाव एकवीरा देवी रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्याला मोऱ्या न टाकल्याने पावसाळ्यात अनेकदा विविध ठिकाणी रस्ता पाण्याखाली जात असल्याने याचा नाहक त्रास या रस्त्यावरुन वाहतूक करणाऱ्या भाविक व वेहरगाव-दहिवली नागरिकांना सहन करावा लागत होता.

परंतु आता तर दहिवली-पडवळवाडी रस्त्याच्या काही अंतरावर ओढ्याचे पाणी जाण्यास अडथळे निर्माण झाल्याने गटर तुंबल्याने पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात पाणी रस्त्यावरुनच वाहत असल्याने शेवाळे निर्माण झाले आहे.

एकवीरादेवी दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भाविकांना या निसरड्या रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे दहा ते बारा दुचाकी या रस्त्यावरून घसरत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा व अडथळे बाजुला काढून अथवा योग्य ठिकाणी पाईप टाकून पाणी जाण्यास मार्ग निर्माण करावा. अपघात होणार नाही, पाणी रस्त्यावर येणार नाही याची काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणी वेहरगाव-दहिवली नागरिक व एकवीरादेवी दर्शनासाठी येणारे भाविक करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.