काशीळजवळ भीषण अपघातात सात ठार

हज यात्रेसाठी निघालेल्या सौदागर कुटुंबीयांवर काळाची झडप

नागठाणे: पुणे-बेंगळुरू महामार्गावर काशीळ (ता. सातारा) गावाच्या हद्दीत धारवाड येथील सौदागर कुटुंबीयांवर बुधवारी पहाटे काळाने झडप घातली. कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात सौदागर कुटुंबातील सातही जणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातातून चालक बचावला असून गंभीर जखमी झाला आहे.

निजामउद्दीन अब्दुलनबी सौदागर (वय 69), सफुरा निजामउद्दीन सौदागर (वय 58), मनसुफ निजामउद्दीन सौदागर (वय 40), नफीसा मनसुफ सौदागर (वय 35), आकसा मनसुफ सौदागर (वय 4), अहमद रजा मनसुफ सौदागर (वय 2), तय्यबा मनसुफ सौदागर (वय 6, रा. मदिहाळ डेअरी रोड, धारवाड) अशी अपघातातील मृत कुटुंबीयांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, धारवाड येथील सौदागर कुटुंबातील निजामुद्दीन सौदागर व त्यांच्या पत्नी सफुरा सौदागर हे वृद्ध दांपत्य हज यात्रेसाठी निघाले होते. त्यांना मुंबईपर्यंत सोडण्यासाठी त्यांचा एकुलता एक मुलगा मनसुफ, सून नफीसा व त्यांची नातवंडे तयब्बा, आकसा, अहमद रजा निघाले होते.

सौदागर कुटुंबीयांची गाडी बुधवारी पहाटे काशीळ गावच्या हद्दीत आली असताना चालक शहानवाज भंडारी याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याकडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या भीषण अपघातात गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला असून कुटुंबातील सर्वच सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक गंभीर आहे.

अपघाताची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलीस फौजदार कुंभार, मनोहर सुर्वे, चेतन बगाडे, किरण निकम, धनंजय जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन गाडीमध्ये अडकलेल्या सौदागर कुटुंबीयांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले. तसेच अपघातात गंभीर जखमी झालेल्या तायब्बा मन्सूफ सौदागर व चालक शहांनवाज भंडारी यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तायबा मन्सूफ सौदागर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून चालकावर उपचार सुरु आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.