अग्रलेख : मेगाभरतीचा फायदा होणार का?

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जेमतेम 4 महिन्यांवर आली असताना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये इतर राजकीय पक्षांमधून होत असलेली ‘मेगा भरती’ भाजप-सेना युतीला पुन्हा सत्तेवर येण्यासाठी फायदेशीर ठरणार का? याची चर्चा करण्याची वेळ आता आली आहे.

बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दिग्गज नेत्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही युतीमध्येच आगामी निवडणूक लढवू, राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार असून आता फक्‍त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे, अशी खात्री व्यक्‍त केली. त्यांच्या या विधानाला दोन पदर होते, एक तर आगामी निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रच लढतील हे त्यांना सांगायचे होते आणि आम्ही नवे विक्रम प्रस्थापित करून पुन्हा सत्तेवर येऊ, असेही त्यांना म्हणायचे होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने असा विक्रम करून दाखवला आहे. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303 जागा जिंकल्या आणि युतीचा आकडा 350 वर गेला. आता महाराष्ट्रातही असाच विक्रम करण्याची भाजपची इच्छा असेल तर त्यात गैर काही नाही; पण तो विक्रम करण्यासाठी त्यांना शिवसेनेची साथ लागणारच आहे. म्हणूनच त्यांना आम्ही एकत्रच लढणार असल्याचा पुनरुच्चार करावा लागला.

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमताचा नवीन रेकॉर्ड करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू असले तरी पण भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार, अशा जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय गोटात सुरू आहेत. या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असले तरी आगामी काळातही या चर्चा थांबणार नाहीत. कारण इतर पक्षातील दिग्गजांना आपल्या पक्षात घेण्याची भाजप आणि शिवसेना यांच्यातील स्पर्धा वेगळेच काही सांगत आहे.

लोकसभा निवडणुकीत काहीशी दुय्यम भूमिका घेणारी शिवसेना विधानसभा निवडणुकीत प्रमुख भूमिका घेण्याच्या मूडमध्ये आहे, तर “शत प्रतिशत भाजप’चा नारा भाजपने अद्यापही सोडलेला नाही. गेल्या वेळी राज्यात सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. भाजप आणि शिवसेनाही अत्यंत वाईट पद्धतीने वेगळे झाले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने 288 पैकी 122 जागा जिंकल्या होत्या. बहुमतासाठी त्यांना केवळ तेवीस जागा कमी पडल्या. काही अपक्ष आणि सहकारी पक्षांसह ही संख्या 132 वर गेली होती, तरीदेखील बहुमतासाठी 13 जागा कमी पडल्याने अखेर शिवसेनेशी पुन्हा युती करावी लागली. तरीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे राज्यात विरोधी पक्षप्रमाणेच वागत होते.

लोकसभेच्या काळात खऱ्या अर्थाने दोन्ही पक्षांची दिलजमाई झाली; पण आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्रिपदावर शिवसेना अधूनमधून दावा करीत असल्याने फडणवीस यांना अपेक्षित असलेला विक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील असे दिसते. भाजपचे लोकसभेतील यश, मोदींची उजळलेली प्रतिमा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण केलेला कार्यकाळ या आधारे भाजपचाच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे जाहीर करून भाजपने शिवसेनेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याची तयारी केली आहे. तरीही भाजपचा “प्लॅन बी’ तयार असावा अशी शंका यायला जागा आहे आणि भाजपमधील मेगाभरती त्याचे उदाहरण आहे.

भाजपचे संघटन कमकुवत असलेल्या मतदारसंघात कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचा सक्षम कार्यकर्ता, आमदार यांना पक्षात घेऊन तेथील आपला विजय पक्‍का करण्याची मोहीमच भाजपने उघडलेली दिसते. लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी जी रणनीती वापरली होती तीच रणनीती महाराष्ट्रातही वापरली जात आहे. यावेळी पश्‍चिम बंगाल, कर्नाटक यासारख्या राज्यांतून जादा जागा जिंकून आणून भाजपने त्रिशतक गाठले होते. आता राज्यातही भाजप जेथे कमकुवत आहे त्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती स्पष्ट दिसत आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील नेत्यांना आपल्याकडे आणणे हे त्याचे ताजे उदाहरण मानावे लागेल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्याने भाजपला साथ देऊन किमान एकतरी आमदार दिला होता; पण सातारा जिल्ह्यात भाजपची पाटी कोरी होती. पण गेल्या 5 वर्षांच्या काळात भाजपने जाणीवपूर्वक सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून तेथील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांना आपल्या पक्षात घेतले.

राज्यात इतरत्र कोठेही भाजपच्या जागा कमी झाल्या तर अशा ठिकाणाहून ती कमी भरून काढण्याच्या उद्देशानेच या मेगा भरतीच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा फायदा निश्‍चितच होणार आहे. कारण भाजपने ज्या नेत्यांना आपल्या पक्षात स्थान दिले आहे त्यांची स्वतःची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेच्या जोरावरच ते आतापर्यंत निवडून आले आहेत. त्याचा फायदा भाजपलाही होईल हे उघड आहे. तरीही ही निवडणूक खूपच सोपी जाईल, असे गृहीत धरण्याची चूक भाजपला करता येणार नाही.

भाजपने दिग्गजांना आपल्या पक्षात घेतल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष चवताळले आहेत. अशा नेत्यांना निवडणुकीत पराभूत करून धडा शिकवण्याची रणनीती या पक्षांकडून आखली जाईल. निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमध्ये आलेल्या या नेत्यांना नव्या पक्षाशी जुळवून घेण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नाही. त्यातच अनेक वर्षे भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजीची भावना आहे. गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास विरोध करणाऱ्या नवी मुंबईतील भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांची प्रतिक्रिया याबाबत पुरेशी बोलकी आहे. ठिकठिकाणी अशी परिस्थिती आहे; पण भाजप निवडणूक व्यवस्थापनात माहीर असल्याने नाराजीचा जास्त फटका बसणार नाही याची काळजी घेतली जाईलच.

एकूणच विस्कळीत झालेला विरोधी पक्ष, लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर वाढलेला आत्मविश्‍वास यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी नवा विक्रम नोंदवण्याची खात्री व्यक्‍त केली असली तरी गाफील राहणे त्रासदायक ठरू शकते. प्रत्येक निवडणुकीची मैदाने आणि रणनीती भिन्न असते, असे विधान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत विक्रम करण्यासाठी तशीच सक्षम रणनीती भाजपला राबवावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.