पुणे – गेल्या तीन वर्षांपासून चर्चेत असलेल्या सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली महाराष्ट्र पात्रता परीक्षा अर्थात “सेट’ ही राष्ट्रीय स्तरावरील “नेट’च्या धर्तीवर ऑनलाइनद्वारे घेण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. त्यामुळे यापुढची “सेट’ परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी पुरेशी यंत्रणेची तयारी न झाल्याने सेट परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार असल्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे.
राज्यातील सर्व जिल्हा केंद्रावर विद्यापीठाला सेट परीक्षा घेणे आव्हानात्मक आहे. तसेच वेळेत निकाल लावण्यासही मर्यादा येतात. या सर्व पार्श्वभूमीवर “नेट’च्या धर्तीवर “सेट’ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे विद्यापीठाने प्रस्तावित केले होते. त्यामुळे सेटची ऑनलाइन परीक्षेकडे सर्वांचे लक्ष होते.
मध्य प्रदेशात “सेट’ परीक्षा 2018 पासून ऑनलाइन घेण्यात येते. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठामार्फतही सेट परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मध्यंतरी करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन परीक्षेचा पर्याय पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर यापुढची सेट परीक्षा ऑनलाइन होईल, अशी उमेदवारांची अपेक्षा होती. मात्र, पुरेशी तयारी नसल्याच्या कारणावरून सेटची ऑनलाइन परीक्षा यंदाही बारगळली आहे.
हल्ली सर्व प्रवेश परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होत आहे. बहुतांश भागात संगणकाची यंत्रणाही सक्षम आहे. त्यामुळे ऑनलाइन सेट परीक्षा घेण्यास काहीच अडचण नाही. मात्र त्यासाठी आणखी वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन परीक्षा झाल्याने निकालही वेळेत लावणे शक्य होईल. त्यातील त्रुटी दूर करून नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ही परीक्षा योग्य पद्धतीने घेता येऊ शकते.
“सेट परीक्षेच्या धोरणात्मक निर्णयासाठी आवश्यक असणारी सुकाणू समितीची अद्याप बैठक झालेली नाही. मात्र, यापुढची सेट परीक्षा पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीने होईल. ऑनलाइन परीक्षेसाठी सर्व यंत्रणा अद्याप कार्यान्वित नसल्याने सेट परीक्षा ऑफलाइनद्वारे होणार आहे.” – डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
महत्त्वाचे मुद्दे…
- राज्यात अन्य पात्रता परीक्षा ऑनलाइनद्वारे होतात
- सर्व जिल्ह्यात संगणक यंत्रणा असल्याने ऑनलाइन परीक्षा शक्य
- ऑनलाइन “सेट’मुळे निकाल लवकर लागणे शक्य
- निकालाचे विश्लेषण व मूल्यांकन करणे शक्य