राजगुरूनगरात आज जरांगे पाटील कडाडणार
राजगुरूनगर – येथे शुक्रवारी (दि. 20) होणारी मनोज जरांगे पाटलांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून या सभेत जरांगे पाटील कोणत्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटचे केवळ पाच दिवस शिल्लक असताना राजगुरूनगर येथे त्यांची भव्य सभा होणार आहे. या सभेला पाच लाख मराठा बांधव येण्याची शक्यता आयोजकांनी वर्तवली आहे.
या सभेचे संपूर्ण नियोजन पूर्ण झाले असल्याचे खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष मनोहर वाडेकर,अंकुश राक्षे यांनी सांगितले. या सभेसाठी शंभर एकरचे मैदान उपलब्ध करण्यात आले आहे. पार्किंगसाठी 40 एकरचे मैदान सभेच्या पुढील बाजूस करण्यात आले आहे. दरम्यान, खेड विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले, उद्याच्या सभेसाठी चोख बंदोबस्त असून वाहतुकीत कोणतेही बदल नाहीत.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहने सुरु राहतील. सभेच्या समोर 40 एकरांमध्ये पार्किंग आहे. मराठा क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष मनोहर वाडेकर म्हणाले की, पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला नसून तो मराठ्यांचा बालेकिल्ला आहे. मराठ्यांच्या बालेकिल्ल्यात आजपर्यंत कोणती सुरुवात नव्हती ती मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मराठे यापुढील काळात राज्यकर्त्यांना सुरुंग लावण्याचे काम करतील, असे त्यांनी नमूद केले.
51 जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी होणार
राजगुरुनगर येथे होणाऱ्या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील सभेच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यावर 51 जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष सभेला होईल. सभेत खेड तालुका क्रांती मोर्चाचे सदस्य प्रमुख मान्यवर यांचे भाषण होणार असून लगेचच मनोज जरांगे यांचे भाषण होणार आहे त्यानंतर जरांगे बारामतीकडे रवाना होतील.
नेते फक्त मते मागायला येतात समाजासाठी ठोस भूमिका घेत नाहीत. आतापर्यंत मराठा समाजासाठी कोणताच नेता पुढे आला नाही. आता मनोज जरांगे रूपाने नेतृत्व मिळाले आहे. कदाचित सर्व मराठा एकवटली व भविष्यात जरांगे पाटील याना मुख्यमंत्री करतील.
– अंकुश राक्षे, समन्वयक
तगडा फौजफाटा
* जिल्हा पोलीस अधीक्षक
* अपर पोलीस अधीक्षक
* 5 डीवायएसपी
* 20 पोलीस निरीक्षक
* 45 सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक
* 450 महिला पुरुष पोलीस यांच्यासह होमगार्ड्स .