पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांचे निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहेत. त्यानुसार २७४ अभ्यासक्रमांच्या परीक्षा होत असून, त्याला साधारण सात ते आठ लाख विद्यार्थी बसले आहेत.
प्रथम वर्ष आणि अंतिम वर्षांच्या परीक्षांना सुरूवात झाली असून, मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुख्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडणार आहेत. तर, जून महिन्यात उर्वरित परीक्षा होणार आहे. मात्र, सर्व परीक्षांचा निकाल हा जून महिन्याच्या अखेरपर्यत जाहीर करण्याची तयारी परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून करण्यात आली आहे.
त्यासाठी पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील महाविद्यालयांच्या परीक्षांची जबाबदारी असणाऱ्या प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. या कार्यशाळा तिन्ही जिल्ह्यातील महत्त्वाच्या महाविद्यालयांत झाल्या आहेत. त्यामध्ये निकाल तातडीने लागण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.