पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या ठरवलेल्या प्रयोगाला ऐन वेळी परवानगी नाकारल्याने प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठ पुन्हा एकदा नाटकावरुन चर्चेत आले आहे. दरम्यान, हे नाटक रद्द केले नसून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
सध्या महात्मा फुले जयंती ते डाॅ. आंबेडकर जयंतीदरम्यान विद्यापीठात महोत्सव सुरू आहे. विद्यापीठातील विद्यार्थी विकास मंचाने याच महोत्सवात हा प्रयोग आयोजित केला होता. त्यासाठी विद्यापीठाने परवानगी दिली आहे, असे विद्यार्थी विकास मंचाने आम्हाला १० दिवसांपूर्वी कळवले होते. त्यानुसार आम्ही निर्माता म्हणून सर्व कलाकार व तंत्रज्ञांच्या तारखा घेतल्या, प्रवासाची तिकीटे बूक केली आणि काल अचानकच विद्यापीठाच्या समितीने प्रयोगाला परवानगी नाकारली, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी आपल्या एक्स या सोशल मीडियावर केला आहे.
विशेष म्हणजे मागील वर्षी याच नाटकाचा प्रयोग पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादात झाला होता. मग याच वर्षी नेमकी काय अडचण आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या सेंसाॅर बोर्डाने प्रमाणपत्र दिलेले हे नाटक आहे. गेली १३ वर्षे या नाटकाचे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात व दिल्लीसह इतरत्र ८५० पेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत.
“विद्यापीठात सदर नाटक मागील वर्षीच आयोजित केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यंदा इतरही काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाने हे नाटक रद्द केलेले नाही तर पुढे ढकलेले आहे. काही कालावधीनंतर या नाटकाचा प्रयोग आयोजित केला जाणार आहे.” – डाॅ. विजय खरे, कुलसचिव , पुणे विद्यापीठ