पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पीएच.डी. प्रबंध सादर करण्यासाठी लाच मागितलेल्या प्राध्यापिकेची गाइडशीप रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित प्राध्यापिकेकडे मार्गदर्शन घेणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांना दुसऱ्या गाइडकडे समायोजन करण्यात येत आहे. हा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतला आहे.
सांगवी येथील बाबुरावराजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका आणि पीएच.डी.मार्गदर्शक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. शकुंतला माने यांनी विद्यार्थ्यांचा पीएच.डी.चा शोध प्रबंध विद्यापीठाकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, संबंधित विद्यार्थ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबबात तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा रचून माने यांच्यावर कारवाई केली.
प्रा. माने यांच्याकडे आठ विद्यार्थी पीएच.डी.चे मार्गदर्शन घेत होते. या आठही विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दुसऱ्या गाईडकडे स्थलांतरित केले आहे. त्यामुळे केवळ एकाच नाही, तर माने यांच्याकडे असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन मार्गदर्शक मिळाले आहेत. याप्रकरणी संबंधित प्राध्यापिकेच्या महाविद्यालयास पत्र पाठविण्यात आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे.