राज्य सीईटी सेलची माहिती : तक्रारी वाढल्याने निर्णय
पुणे – अभियांत्रिकी आणि वैद्यकीय या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी “पीसीएमबी’ (भौतिकशास्त्र, रसायनाशास्त्र, जीवशास्त्र व गणित) या एकाच गटातून सीईटी विद्यार्थी द्यायचे. आता मात्र एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या एमएचटी-सीईटीत विद्यार्थ्यांना “पीसीएमबी’ हा पर्याय नसेल. त्याऐवजी “पीसीबी’ (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र) व “पीसीएम’ (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित) या गटाची स्वतंत्र परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली.
अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांतील प्रवेश बारावीनंतर एमएचटी-सीईटी परीक्षाद्वारे होते. याच परीक्षेच्या गुणावर अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिले जातात. मागील वर्षापर्यंत या परीक्षेच्या निकालासाठी पर्सेन्टाइल पद्धतीचा अवलंब केला जात होता. मात्र, निकालावेळी अनेक तक्रारी आल्या. त्या पार्श्वभूमीवर यंदा अभियांत्रिकी व वैद्यकीय दोन्ही क्षेत्रांसाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना “पीसीएमबी’ ही परीक्षा देण्याऐवजी त्यांनी या दोन्हीच्या म्हणजे “पीसीबी’ व “पीसीएम’ स्वतंत्र परीक्षा द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही गटांचा निकाल, गुणपत्रिका स्वतंत्र असतील.
यंदा शुल्कात कोणतीही सवलत नाही
विद्यार्थी “पीसीबी’ व “पीसीएम’ अशा दोन्ही परीक्षा देऊ शकतात. मात्र, गेल्या वर्षीपर्यंत दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्यात येत होती. यंदा मात्र, दोन्ही परीक्षा दिल्या, तरी अशा प्रकारची कोणतीच सवलत शुल्कात देण्यात येणार नाही. दोन्ही परीक्षा स्वतंत्र होणार असल्याने त्याचे शुल्क आणि अर्जही विद्यार्थ्यांना स्वतंत्र, वेगवेगळ्या पद्धतीने भरावे लागेल, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.