सरकारी जागांवर धनदांडग्यांचा कब्जा

टाकळी हाजी येथील शासकीय खिरापत : सर्वसामान्य जनता संतापली

मुकुंद ढोबळे

शिरूर – टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील सरकारी गायरान जमिनीवर गाव पुढाऱ्याच्या आशीर्वादाने धनदांडग्यांची अतिक्रमण करण्याची स्पर्धा लागली आहे. एकाच दिवसात शेकडो लोकांना जागा वाटप करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. गावच्या हद्दीमधील अतिक्रमणावर कधी कारवाई होणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. टाकळी हाजी गावच्या गट नं 629/1 हा सुमारे 28 हेक्‍टर क्षेत्र आहे. दि. 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत या गटात अतिक्रमण होऊ न देता सरकारी व सार्वजनिक कामासाठी देण्याचा ठराव करण्यात आला होता.

या सभेला माजी आमदार पोपटराव गावडे, सरपंच दामू घोडे यांच्या उपस्थितीमध्ये ठराव करण्यात आला. मात्र, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी काही पुढाऱ्यानी आर्शीवाद देत सरकारी जमीनीमध्ये प्लॉट पाडून जागा वाटप करण्यात आली. फुकटची जागा मिळविण्यासाठी काहीच्या मारामाऱ्या झाल्या. टाकळी हाजी शिरूर रस्त्यावर बापूसाहेब गावडे विद्यालयासमोर ही जमीन आहे. तेथे काही लोकांनी मागील महिन्यांत पक्‍के बांधकाम करून दुकाने थाटली आहेत. त्यानंतर अशा प्रकारे फुकटच्या जागेवर ताबा घेण्याचा सपाटा लावला आहे.

काहीच्या टपऱ्यांची कामे सुरू आहे तर काही जणांनी सिमेंटचे खांब लावून जागेचा ताबा मिळविला आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजुने शेकडो लोकांनी जागा ताब्यात घेण्यासाठी गर्दी केली होती. टाकळी हाजी गावात सध्या अतिक्रमण करण्याचा मोठा सपाटा लावला आहे. त्यामुळे भविष्यात सरकारी प्रकल्पासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. असा सवाल सर्वसामान्य नागरिक व्यक्‍त करीत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र, विश्रामगृहासमोरही मोठे अतिक्रमण झाले आहे. गावातील सर्व सरकारी जागेमधील खासगी अतिक्रमण काढावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. सरकारी जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ देणार नाही. पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येईल, असे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी सांगितले.

अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस बोर्ड लावला आहे. त्यांना दहा दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर अतिक्रमण काढण्याची पुढील कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार केली जाईल.
– राजेंद्र खराडे, ग्रामविकास अधिकारी, टाकळी हाजी.

सरकारी जमीन ग्रामपंचायतीला देखभालीसाठी काही अटींवर दिलेली असते. परस्पर कुणालाही अतिक्रमण करून बांधकामे करता येणार नाहीत. ही बांधकामे केल्यास काढण्यात येतील.
– लैला शेख, तहसीलदार, शिरूर.

Leave A Reply

Your email address will not be published.