हैदराबाद -अक्सर पटेलने फलंदाजी व गोलंदाजीत केलेली अष्टपैलू कामगिरी व त्याला अन्य सहकारी खेळाडूंनी दिलेली साथ यांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सोमवारी आयपीएल स्पर्धेत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा अवघ्या 7 धावांनी पराभव केला.
दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 145 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या सलामीविरांनी 31 धावांची सलामी दिली. स्थिरावलेला हॅरी ब्रुक 7 धावांवर त्रिफळाबाद झाला. त्यानंतर मयंक आग्रवाल व राहुल त्रिपाठी यांनी डाव सावरताना संघाचे अर्धशतक फलकावर लावले. आग्रवाल अर्धशतकाच्या जवळ आलेला असतानाच बाद झाला. त्याने आपल्या 49 धावांच्या खेळीत 39 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार फटकावले. हैदराबादला त्यावेळी विजयासाठी 72 धावांची गरज होती व खेळपट्टीवर त्रिपाठीसह अभिषेक शर्मा खेळत होते. हे दोघेही पाठोपाठ बाद झाले.
त्रिपाठीला 15 धावांवर इशांत शर्माने तर अभिषेकला 5 धावांवर कुलदीप यादवने बाद केले. यावेळी कर्णधार एडन मार्करम व हेनरीच क्लासेन ही भरवशाची जोडी मैदानावर होती व त्यांना 36 चेंडूत 60 धावांची गरज होती. मार्करमकडून मोठ्या अपेक्षा होत्या मात्र, तो अक्सर पटेलच्या गोलंदाजीवर 3 धावांवर परतला. पटेलने फलंदाजीसह गोलंदजीतही अफलातून कामगिरी केली. हैदराबादला 18 चेंडूत 38 धावांची गरज होती.
सुंदर व क्लासेन चांगले खेळत होते. मात्र, अनावश्यकपणे फटका मारून क्लासेन 19 चेंडूत 3 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांवर परतला. यानंतर सुंदरने आक्रमक फलंदाजी करत विजय दृष्टीपथात आणला होता. अखेरच्या षटकात त्यांना 13 धावांची गरज होती. सुंदरने निकराचे प्रयत्न केले मात्र, त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. त्याने 15 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 24 धावांची खेळी केली. दिल्लीकडून अक्सर पटेल व अनरीच नोर्जे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
तत्पूर्वी,कर्णधार डेव्हीड वॉर्नर, मिशेल मार्श, मनिष पांडे व अक्सर पटेल यांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 20 षटकांत 9 गडी गमावून 144 धावांचे माफक आव्हान ठेवता आले.
दिल्लीचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र,
दिल्लीच्या डावातील पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर सलामीवीर फिलीप सॉल्ट चौथ्याच चेंडूवर परतला. त्यानंतर आलेल्या मिशेल मार्शने फटकेबाजीतच प्रारंभ केला. त्याने अवघ्या 15 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या मात्र, अशाच प्रयत्नात तो टी. नटराजनच्या गोलंदाजीवर बाद झाला.
यावेळी वॉर्नरने सर्फराज खानच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. सर्फराजने मिळालेली ही सुवर्णसंधी वाया घालवली. तोदेखील सुंदरच्या गोलंदाजीवर 10 धावा काढून परतला. वॉर्नर स्थिरावलेला असतानाही 20 चेंडूत 2 चौकार व 1 षटकारासह 21 धावांवर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
अमन हकिम खानने पुन्हा एकदा निराशा केली. त्यालाही सुंदरनेच बाद केले. यावेळी दिल्लीची स्थिती 5 बाद 95 अशी बिकट बनली होती. त्यानंतर मनिष पांडे व अक्सर पटेल ही जोडी एकत्र आली. या जोडीने डावातील 15 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले तसेच अर्धशतकी भागीदारीही केली. पटेल 34 चेंडूत 34 धावा करून भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. मात्र, त्यापूर्वी या जोडीने 69 धावांची भागीदारी केली. पाठोपाठ मनिष पांडेही 34 धावांवर धावबाद झाला. त्याने 27 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार फटकावले. त्यानंतर हैदराबादने दिल्लीचा डाव दीडशतकी धावांच्या आतच रोखला. हैदराबादकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 तर भुवनेश्वर कुमारने 2 गडी बाद केले.
अखेर पृथ्वीला डच्चू
यंदाच्या स्पर्धेत सातत्याने सुमार कामगिरी करत असलेला दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला प्लेइंग इलेव्हनमधून या सामन्यासाठी बाहेर ठेवण्यात आले. त्याच्या जागी सर्फराज खानचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ललित यादवच्या जागी रिपल पटेलला संधी देण्यात आली आहे. गेल्या सहा सामन्यांत पृथ्वीने 12, 7, 0, 15, 0, 13 अशा धावा केल्या आहेत.
लक्षवेधी
दिल्लीची पुन्हा
एकदा निराशाजनक सुरुवात
सलामीवीर फिलिप सॉल्ट पहिल्याच षटकात परतला
हैदराबादच्या भुवनेश्वरचे पहिल्याच षटकात यश
मार्शचा अडसर
टी. नटराजनने
केला दूर
सलग पाच पराभवानंतर दिल्लीची वाट खडतर
ब्रुककडून पुन्हा निराशा
आग्रवालचे अर्धशतक हुकले
त्रपाठी पुन्हा अपयशी
दिल्लीकडून अक्सर पटेलची अष्टपैलू खेळी
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 9 बाद 144 धावा. (मनिष पांडे 34, अक्सर पटेल 34, मिशेल मार्श 25, डेव्हीड वॉर्नर 21, वॉशिंग्टन सुंदर 3-28, भुवनेश्वर कुमार 2-11). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 6 बाद 137 धावा. (राहुल त्रिपाठी 15, हेनरीच क्लासेन 31, मयंक आग्रवाल 49, वॉशिंग्टन सुंदर नाबाद 24, अक्सर पटेल 2-21, अनरीच नोर्जे 2-33).