नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील सिडनीमधून देशाची मान खाली घालायला लावणारी घटना समोर आली आहे. तिथे स्थायिक असणारे बालेश धनखर नावाच्या एका उद्योगपतीने नोकरीचे आमिष दाखवून पाच महिलांना ड्रग्ज देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नराधमाने एवढ्यावरच न थांबता महिलांवर अत्याचार करताना त्याचे व्हिडीओही काढले.
सिडनी न्यायालयाने सुनावणीनंतर त्याला दोषी घोषित केले आहे. विशेष म्हणजे बालेश धनखरचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांबरोबर फोटोही समोर आले आहेत. यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. बलात्कारात दोषी सिद्ध झालेल्या बालेश धनखरचे बड्या राजकीय नेत्यांशी चांगले होते. त्याने ऑस्ट्रेलियात भारतातील सत्ताधारी भाजपाला पाठिंबा देणारा उद्योजकांचा एक समूह तयार केला होता.
धनखर ऑस्ट्रेलियातील भाजपाला पाठिंबा देणाऱ्या या समुहाचे नेतृत्व करत होता. विशेष म्हणजे धनखरचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्याचे फोटोही समोर आले आहेत. मात्र, ही प्रकरणं समोर आल्यानंतर त्याने हे फोटो हटवण्यास सुरुवात केली. धनखरचे याच राजकीय ओळखीमुळे सिडनीतील अनेक मोठ्या नेत्यांशीही राजकीय संबंध होते.
सिडनी पोलिसांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये बालेश धनखरच्या घरावर छापे टाकल्यानंतर त्यांना महिलांवर बलात्कार केल्याचे १७ व्हिडीओ सापडले होते. यातील काही व्हिडीओत पीडित महिला बेशुद्ध अवस्थेत दिसल्या, तर काही व्हिडीओत महिला भयानक स्वप्न पाहत असल्याप्रमाणे ओरडताना दिसल्या. न्यायालयाने बालेश धनखरला तब्बल ३९ आरोपांमध्ये दोषी घोषित केले आहे. यात १३ बलात्कार, सहमतीशिवाय व्यक्तिगत व्हिडीओ शूट करण्याची १७ प्रकरणं , अमली पदार्थांचा उपयोग करण्याचे ६ प्रकरणांचा समावेश आहे.