नवी दिल्ली: कॉंग्रेसचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते प्रल्हादसिंग साहनी यांनी रविवारी आम आदमी पक्षात (आप) प्रवेश केला. तब्बल चार वेळा दिल्ली विधानसभेवर निवडून गेलेल्या साहनी यांचा प्रवेश आपची ताकद वाढवण्यास हातभार लावणारा ठरणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत 68 वर्षीय साहनी यांनी त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. कुठल्या अपेक्षेने नव्हे; तर दिल्लीच्या विकासात योगदान देण्याच्या उद्देशाने आपमध्ये दाखल झालो, अशी प्रतिक्रिया साहनी यांनी दिली.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे निकटवर्तीय म्हणून साहनी यांची ओळख होती. त्यांनी 1998 ते 2015 या कालावधीत दिल्ली विधानसभेत चांदणी चौक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, 2015 मधील निवडणुकीत त्यांचा आपच्या उमेदवार अलका लांबा यांनी पराभव केला.
लांबा यांनी काही दिवसांपूर्वी बंडाचे निशाण फडकावत आपला रामराम ठोकला. नंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यापार्श्वभूमीवर, साहनी आपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. त्या निवडणुकीत आपकडून साहनी यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.