नवी दिल्ली – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेशातील पक्षाच्या संचालन समितीचे प्रमुखपद सोडले आहे. काही दिवसांपुर्वी गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या जम्मू काश्मीर प्रदेश समितीतील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या दोन ज्येष्ठ नेत्यांनी पक्षातील महत्वाच्या पदांचे राजीनामे दिल्याने कॉंग्रेस मधील अस्वस्थता आता आणखी चव्हाट्यावर आली आहे.
कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुलामनबी आझाद यांना जम्मू काश्मीर कॉंग्रेस प्रचार समितीचे अध्यक्षपद दिले होते पण आझाद यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला आहे. कॉंग्रेस पक्षांवर नाराज असलेला जी 23 नेत्यांचा जो गट आहे त्या गटात या दोन्ही नेत्यांचा समावेश आहे. या दोन्ही नेत्यांनी आपल्याकडील जबाबदाऱ्यां सोडून दिल्याने त्यांचा पक्षावर अजूनही राग कायम असल्याचे यातून ध्वनीत होत आहे.