– सुनील राऊत
पुणे – शहरात करोनामुळे मृत्यूंमध्ये सर्वाधिक संख्या ज्येष्ठ नागरिक तसेच इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांची आहे. यामुळे महापालिकेने आता शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींची पुढील दोन महिने नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. इतर गंभीर आजारी ज्येष्ठांची करोनाची चाचणीही महापालिका करणार आहे.
महापालिकेने करोना रोखण्यासाठी केलेल्या पाहणीत सुमारे 1 लाख 7 हजार 18 ज्येष्ठ नागारिक आढळले असून, 2 हजार 502 गर्भवती आहेत. या घटकांना करोनाचा सर्वाधिक धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेने मागील दोन महिन्यांपासून शहरात करोना संशयितांचे सर्वेक्षण हाती घेतले होते. यासोबतच ज्येष्ठ नागरिक तसेच इतर गंभीर आजारी रुग्णांची माहिती संकलित झाली होती.
दरम्यान, शहरात करोनामुळे आतापर्यंत सुमारे 352 मृत्यू झाले असून, त्यातील 45 जणांचा मृत्यू करोनाने झाला आहे. तर उर्वरित मृतांमध्ये सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक असून त्यांना इतर गंभीर आजार असल्याचे करोना मृत्यू अन्वेशन समितीच्या तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे या करोना चाचणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
अशी होणार तपासणी
आशा वर्कर, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीला डॉक्टरांचे पथक देऊन ज्येष्ठ नागरिकांची घरोघरी तपासणी होणार आहे. त्यात पुढील दोन महिने नियमितपणे त्यांचा ताप, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, साखर तसेच त्यांना करोनासदृश कोणती लक्षणे आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. ही माहिती महापालिकेच्या कोविड सेंटरला दिली जाणार असून तेथून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.
मायक्रॉसॉफ्टचा मदतीचा हात
या करोनाची तपासणीसाठी मायक्रॉसॉफ्ट कंपनीने महापालिकेस “सीएसआर’अंतर्गत सुमारे 1 कोटी 40 लाखांचा निधी दिला आहे. यातून सुमारे 38 हजार इतर आजार असलेल्या रुग्णांची करोना चाचणी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. याशिवाय महापालिकेनेही या रुग्णांसाठी 67 लाखांची स्वतंत्र तरतूद केली आहे.