विधानभवनाबाहेर पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमिवर भाजपला बहुमत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी विधीमंडळाचे अधिवेशन केव्हाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमिवर मुंबईचे पोलीस संजय बर्वे यांनी सोमवारी विधीमंडळातील सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर विधानभवनाबाहेरील पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
भाजपकडे बहुमताचे संख्याबळ नसतानाही त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. राज्यात लोकशाहीची पायमल्ली झाली असून भाजपचा शपथविधी लोकशाहीच्या घटनेविरोधात असून त्याविरोधात शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. भाजपकडे बहुमत असेल तर त्यांनी तातडीने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे, अशी मागणी या तिन्ही पक्षांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यामुळे न्यायालयाकडून केव्हाही बहुमताला भाजपला सामोरे जाण्याचे निर्देश दिले जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमिवर सोमवारी दुपारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत विधानभवनात दाखल झाले. विधानभवन तसेच परिसराची पाहणी करीत त्यांनी तेथील पोलीस सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर सद्याची राजकिय परिस्थिती पाहता विधानभवनाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.