नवी दिल्ली – कोविड-19 साठी आपत्कालीन मदत आणि आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्व राज्यांना जाहीर केलेल्या आर्थिक पैकेजचा दुसरा हप्ता म्हणून 890 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, पंजाब, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमन, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड आणि सिक्कीम या राज्यांना हा निधी देण्यात आला आहे. राज्यांमध्ये कोविडचे एकूण रुग्ण किती आहेत, यानुसार या निधीचा वाटा देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी केलेल्या भाषणात कोविडसाठीची आपत्कालीन स्थिती आणि सुयोग्य यंत्रणा सज्जतेसाठी पैकेज देण्याची घोषणा केली होती. करोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच देशातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधीमुळे, करोनाच्या चाचण्या लवकरात लवकर होऊ शकतील.
या आर्थिक मदतीचा दुसऱ्या टप्प्यात चाचण्यांसाठीची क्षमता वाढवणे, आरटी-पीसीआर मशीन उपलब्ध करुन देणे, आरएनए किट्स, ट्रूनॅट आणि सीबीनॅट मशीन तसेच बीएसएल-2 कॅबिनेट तयार करण्याला प्राधान्य दिले जाईल. त्याशिवाय सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अतिदक्षता खाटा, ऑक्सिजन, जनरेटर आणि वैद्यकीय गैस पाईपलाईन, इत्यादी सुविधा दिल्या जातील. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आशा कार्यकर्त्या आणि इतर स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले जाईल.
या मदतीचा पहिला, 3000 कोटी रुपयांचा टप्पा, एप्रिल महिन्यात देण्यात आला होता. या पैकेजचा भाग म्हणून , राज्यांन आणि केंद्रशासित प्रदेशांना 5 लाख 80 हजार 342 विलगीकरण खाटा, 1 लाख 36 हजार 068 ऑक्सिजन युक्त खाटा आणि 31 हजार 255 अतिदक्षता खाटा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, 86 लाख 88 हजार 357 चाचण्या किट्स आणि 79 लाख 88 हजार 366 व्हायल ट्रान्सपोर्ट मिडीया देण्यात आले आहेत. सुमारे 96 हजार 557 मनुष्यबळ वाढवण्यात आले तसेच 6 लाख 65 हजार 799 लोकांना विशेष प्रोत्साहन निधी देण्यात आला. या पैकेजमध्ये 11 हजार 821 कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याची अतिरिक्त तरतूदही करण्यात आली आहे.