विद्युत पारेषणच्या विरवडे हद्दीतील भांडार विभाग सील

पावणे चार लाखांचा कर थकविल्याप्रकरणी कारवाई; जीटीएल कंपनीच्या टॉवरवरही बडगा
कराड –विरवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत असणाऱ्या विद्युत पारेषण कंपनीच्या भांडार विभागाकडे वारंवार कर मागणी करुनही सुमारे पावणे चार लाख रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी विरवडे ग्रामपंचायतीने विद्युत पारेषण कंपनीच्या भांडार विभागाला सील लावले. तर जवळ पास सात वर्षांपासून पावणे दोन लाख रुपयांचा कर थकवणाऱ्या येथील जीटीएल कंपनीचा मोबाईल टॉवरही सील केला.

याबाबत ग्रामविकास अधिकारी एस. टी. लाटे यांनी सांगितले की, विरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने मार्च एन्डच्या तोडांवर धडक वसूली मोहीम राबवली. मात्र ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या विद्युत पारेषण कंपनीच्या भांडार विभागाच्या वतीने कर भरण्यासाठी चालढकल करण्यात येत होती. भांडार विभागाचा जवळपास पावणे चार लाख रुपयांचा कर थकित आहे.

याबाबत ग्रामपंचायतीने भांडार विभागाकडे वारंवार कर मागणी बिल पाठवूनही त्याची दखल घेतली नाही. अखेर विरवडे ग्रामपंचायतीने राष्ट्रीय लोक अदालतीत याप्रकरणी दावा दाखल केला. लोक अदालतीच्या वतीने घेतलेल्या सुनावणीला नोटीस बजावूनही भांडार विभागाचे कोणीही अधिकारी आले नाहीत. त्यामुळे भांडार विभागाला रितसर जप्तीची नोटीस बजावून सोमवारी विद्युत पारेषणच्या भांडार विभागास सील करण्यात आले.

ग्रामपंचायत हद्दीत जीटीएल कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. या टॉवर व्यवस्थापनाने 2012-13 आजअखेर जवळपास सात वर्षाचा ग्रामपंचायतीचा पावणेदोन लाख रुपयांचा कर थकवला आहे. टॉवर कंपनीला वारंवार मागणी बिले पाठवून व पत्रव्यवहार करूनही ग्रामपंचायतीने टॉवरला जवळपास तीन नोटीस चिटकवल्या आहेत. तरीही टॉवर कंपनीने कर न भरल्याने जीटीएल कंपनीचा टॉवर सील करण्यात आल्याची माहिती एस. टी. लाटे यांनी दिली. यावेळी सरपंच महेश सुतार, उपसरपंच अधिक सुर्वे, सदस्य शंकरराव मदने, बाळासाहेब धोकटे, शरद धोकटे पाटील, कर्मचारी गजानन गुरव, अशोक शिंदे, आकाश शिंदे, गोरखनाथ मलमे, राजू मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)