मेणवली –वाईतील चायनिज गाड्यावर गर्दीचा फायदा घेवून शीळे व निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ ग्राहकांच्या घशात उतरवले जात असल्याची बोंबाबोब ग्राहकाकडून सध्या वाई तालुक्यात जोरात सुरु आहे. शीळे चिकन दिल्यावरुन चायनिज गाड्यांवर रोजच राडाबाजी सुरु आहे. स्थानिक नेते व भाईचाऱ्यांच्या तड़जोडीने मिटवून टाकत चायनिज गाड्यावरील बनावटगिरीवर पांघरून घातले जात आहे.
चायनिज गाड्यावरील खाद्य पदार्थामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असताना आर्थिक तड़जोडीच्या राजकारणामुळे अन्न भेसळ प्रशासन विभाग कुंभकर्णझोपेच सोंग घेत असल्याचा आरोप जनतेकडुन केला जात आहे. अन्न प्रशासन विभाग व स्थानिक भाईचाऱ्यांच्या आशिर्वादाने वाई शहरात चायनिज धंदा तेजीत असून वाई नगरपालिकेच्या वरदहस्ताने रहदारीच्या रस्त्यावर जोषात सुरु आहे. याचे कसलेही सोयरसुतक अन्न भेसळ विभागासह अन्य कुठल्याच प्रशासकीय विभागाला नाही. प्रत्येक विभागाशी झालेल्या मंथली आर्थिक तड़जोडीमुळे चायनिज गाड्या भर रस्त्यात ठाण मांडून वाईकर जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळत असताना अन्न भेसळ व आरोग्य प्रशासन झोपा काढत असल्याने जनतेतुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाईच्या हुतात्मा स्मारका शेजारी बस्तान मांडलेल्या चायनिज गाड्यावरील खाद्य पदार्थांचा वास शंभर मीटर परिसरात दरवळत असल्याने या रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या वाईकर नागरिकांना वासाच्या त्रासाबरोबरच डोळ्यात तिखट गेल्याची अनुभूती घ्यावी लागत आहे. शिवाय जाता येता प्रत्येक नागरिकांना अडवून चायनिज खाण्यासाठी हाका मारत असल्याने अनेक नागरिकांची भंबेरी उडत आहे.
जबरदस्तीने आग्रह झाल्याने महिला वर्गाची कुचंबना होत आहे. वाईतील चायनिजच्या सर्व गाड्यांना शहरातील काही भाईचाऱ्यांचे छुपे पाठबळ असल्यामुळे गाड़ी मालक बिनधास्तपणे बनावट चायनिज पदार्थ लोकांच्या गळी उतरवत आहेत. मैद्याचा सर्रासपणे वापर करून वासापुरते चिकन तुकडे वापरत चिकन चिल्ली व चिकन लॉलीपॉपची मैदा लॉलीपॉप व मैदा चिल्ली बनवून ग्राहकांना पोपट बनवले जात आहे. रंग व मसाल्याचा भरपूर वापर केल्याने चिकन शीळे का ताजे याचा सुगावा लागू दिला जात नाही.
रेशनिंगचे तांदूळ, मैदा, अशुद्ध तेल बनावट तिखट मसाल्याने चवदार हाफ राइस व सुप आग्रहाने ग्राहकांना खाऊ घातले जात आहे. नियमबाह्य सिलेंडर पुरवठा होत असताना अन्न भेसळ विभाग डोळ्याला पट्टी बांधून गांधारीची भूमिका वटवत जनतेच्या आरोग्याशी खेळत असल्याने अन्नभेसळ प्रशासनाच्या डोळ्यावरील पट्टीचा लवकरच सर्व पुराव्यानिशी पोलखोल करणार आहे.
विक्रम वाघ, जिल्हाअध्यक्ष मराठा महासंघ