विज्ञानविश्‍व: येत्या 100 वर्षांत “एआय’

डॉ. मेघश्री दळवी

“एआय’ किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कल्पना नवी नसली तरी ती बराच काळ शास्त्रज्ञांच्या प्रयोगांपुरती होती. हे प्रयोग लहानमोठ्या प्रमाणात सुरू असताना उद्योगधंद्यांनी मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कल्पनेकडे वेगळ्या नजरेने पाहिले.

प्रचंड डेटा वेगाने हाताळणे हे माणसापेक्षा संगणकाला लीलया जमते. त्यामुळे ती मर्यादित क्षमता उद्योगांनी वापरून घ्यायची ठरवली. त्यात या डेटाचे विश्‍लेषण करायला संगणकाला शिकवले तर उद्योगातले अनेक निर्णय जास्त अचूक आणि जास्त वेगाने होऊ शकतात हे मोठमोठ्या कंपन्यांनी पाहिले. त्यांनी या विषयाच्या संशोधनात गुंतवणूक केली. मशीन लर्निंग, डीप लर्निंग हे तंत्रज्ञान त्यामुळे बहरले.

गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये या तंत्रज्ञानाने हळूहळू आपल्या रोजच्या आयुष्यात चांगलाच शिरकाव केला आहे. म्हणूनच स्टॅनफर्ड विद्यापीठाने 2014 मध्ये एक अभिनव उपक्रम सुरू केला. पुढची शंभर वर्षे आपण आणि एआय यांचं नाते कसे बदलत जाईल याची नोंद ठेवण्याचा. या शंभर वर्षांच्या अभ्यासात दर पाच वर्षांनी एक आढावा घेतला जाईल. तंत्रज्ञान, संगणक क्षमता, एआय कुठकुठवर पोहोचले आहे, संगणकांची क्षमता कुठवर आली आहे, तंत्रज्ञानातली झेप, या सगळ्याचा माणसाच्या आयुष्यावर बरावाईट परिणाम, आपल्या समाजावर, राजकारण आणि अर्थकारणावर पडलेला प्रभाव हे सगळं तिथे जतन केले जाणार आहे. एका अर्थाने माणूस आणि एआय यांचा तो इतिहास असणार आहे.

या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला अहवाल दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला. त्यात 2030 मध्ये काय स्थिती असेल याचे भाकीत केलेले आहे. तेव्हा स्वचलित (सेल्फ-ड्रायविंग) गाड्या, रोगनिदान, व्यक्‍तीनुसार आखलेले उपचार आणि वयस्कर व्यक्‍तींना साहाय्य करणारे रोबोट्‌स यात एआयचा सर्वाधिक वापर दिसून येईल. एआय आणि रोबोट्‌स यांची सांगड घालून शेती, अन्न-प्रक्रिया आणि औद्योगिक उत्पादन या क्षेत्रांमध्ये अतिशय कार्यक्षमतेने काम होईल. सोबत ड्रोन्स, स्वचलित ट्रॅक्‍स आणि रोबोट्‌स यांच्या साहाय्याने सेवा उद्योगात मोठा बदल घडून येईल. यातले ड्रोन्स किंवा रोबोट वेटर्स असे काही अनुभव नावीन्य वा कुतूहल म्हणून आपल्यातल्या काही जणांनी घेतले असतील.

वाहतूक व्यवस्था, वस्तूंची साठवण आणि वितरण, शिक्षणक्षेत्र, सार्वजनिक सुरक्षा आणि मनोरंजन या क्षेत्रातही एआय महत्त्वाची कामगिरी बजावतील. या सर्व ठिकाणी जसा फायदा होताना दिसेल तसतशी नवनवी आव्हानेही असतील हे या अहवालात नमूद केले आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्हीची सुरक्षा आणि नोकऱ्यांवर गदा या नेहमीच्या समस्या असतीलच. त्यामुळे एकंदरीत सर्वांचा विश्‍वास जिंकणे हे मुख्य लक्ष्य असेल. त्याशिवाय आजवर माणसांसोबत काम केलेले असताना तिथे थेट रोबोट्‌सचा वावर सर्वांच्या पचनी पडेलच असे नाही. माणसांमधील संवाद कमी होत जाणार ही एक भीती आहेच. त्यामुळे रोबोट्‌स आणि एआय यांच्यासाठी काही नियम वा कायदे करावे लागतील. अशा विविध प्रश्‍नांना स्पर्श करणारा हा अहवाल अतिशय महत्त्वाचा आहे. यापुढेही अशा नियमित अहवालांमधून आपल्याला एआयची नवनवी क्षितिजं सामोरी येणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.