कराड – शहरातील कराड नगरपालिकेच्या शाळांमध्ये 3 नंबरची शाळा संपूर्ण देशात अग्रेसर आहे. सध्याच्या कोविडच्या स्थितीतही शाळेचे ऑनलाईनचे काम जोमात सुरू आहे. मात्र, पालिकेच्या इतर शाळांमध्ये विदारक चित्र दिसत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
पालिकेच्या सध्या कार्यरत असणाऱ्या शाळांमध्ये शाळा क्रमांक 3, 9 व 7 या शाळा आयएसओ मानांकन बनल्या आहेत. तसेच या शाळांचे रूपडेही पालटले आहे. त्याचा शुभारंभ शाळा क्रमांक 3 पासून झाला. मात्र, तेवढ्यावरच न थांबता शाळेने अनेक बदल स्विकारले आहेत. त्यामुळे शाळेची पटसंख्याही वाढत गेली आहे. शाळेतील ऍडमिशन प्रक्रियेसाठी भली मोठी रांग लागलेली प्रतिवर्षी पहायला मिळते.
सध्या कोविडच्या परिस्थितीत मुलांमधीा गुणवत्ता सुधारावी यासाठी विविध प्रक्रियेद्वारे त्यांना शिकविण्यात येत आहे. त्यासाठी केबल, ऑनलाईन शिक्षण याचा वापर केला जात आहे. शाळेचे सर्व शिक्षक शाळांमध्ये येऊन ऑनलाईन शिक्षण देत आहेत. तसेच शिकविण्यात आलेल्या भागावर परीक्षाही घेतली जात आहे.
यामध्ये बालवाडीच्या विद्यार्थ्यांनाही सामावून घेण्यात आले आहे. मात्र, इतर शाळांची स्थिती पाहता अनेक शाळांमधील शिक्षक शाळेत येत नसल्याचे दिसते. तसेच ऑनलाईन शिक्षणाबाबतही उदासीन असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.