भिगवण – येथील प्रभाग 4 मध्ये खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून सुरु केलेल्या कोविड सेंटरला नागरिकांकडून विरोध होत आहे. विवेकानंदनगरमधील नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
हे कोविड सेंटर लोकवस्तीमध्ये असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. इमारतीत स्वच्छतागृह, वाहनतळ, सुरक्षा भिंत, जलनिस्सारण प्रणाली आदी बाबीची कमतरता आहे.
सांडपाणीलगतच्या परिसरात वाहून जाणे, आदी समस्या आहेत. नागरिकांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. याबाबतचे निवेदन बारामतीचे प्रांताधिकारी, इंदापूरचे तहसीलदार, ग्रामपंचायत, भिगवण पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे. प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भिगवण मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय पवार म्हणाले की, परिसरातील कोविड रुग्णांची तात्काळची निकड लक्षात घेऊन अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करूनच नियमानुसार हे कोविड उपचार केंद्र उभारले आहे. आवश्यकतेनुसार नव्या सुविधा उभारता येतील. नागरिकांचे गैरसमजही दूर करु.
इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी आरोग्य विभागाद्वारे चौकशीद्वारे योग्य ती कारवाई करण्याचे सूचित केले आहे. बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनाही निवेदन प्राप्त झाले असून चौकशी करूनच कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.