कराड -माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले. यामध्ये 50 ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण ना. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, आ. पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, संपूर्ण देशात करोनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कराड तालुका हा करोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. येथे उपलब्ध असणाऱ्या सुविधांमुळे सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बाधितांची उपचारासाठी संख्या वाढू लागल्याने अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नव्हते. परिणामी, अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
मात्र, तेथे ऑक्सिजनची असणारी अपुरी सुविधा यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. शहरातील अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेत ऑक्सिजन मशिन खरेदी केल्या आहेत. त्याचा अनेकांना फायदा झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड असणे आवश्यक आहे.
याचा विचार करून यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये 50 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या हॉलच्या उभारणीसाठी निधी देताना या हॉलचा उपयोग कधी रुग्णालयासाठी करावा लागेल, असे वाटले नव्हते. मात्र, सध्याच्या कठीण परिस्थितीत त्याचा उपयोग झाला आहे.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, देशात सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
अशा परिस्थितीत सातारा येथे जम्बो हॉस्पिटलचीही लवकरच उभारणीही करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, डॉ. इंद्रजित मोहिते, शंकरराव खबाले, मंगलाताई गलांडे, नामदेवराव पाटील, नीलम येडगे, मनोहर शिंदे, उपस्थित होते.