- दहावीचा ऑनलाइन निकाल : तालुक्याचा 98.17 टक्के निकाल
- एकूण 81 शाळांपैकी 47 शाळांचे निकाल 100 टक्के
वडगाव मावळ – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मार्च 2020 बोर्ड परीक्षेत मावळ तालुक्याचा 98.17 टक्के एवढा निकाल लागला. तालुक्यातील उत्तीर्ण मुलांचा शेकडा निकाल 97.66 टक्के, तर उत्तीर्ण मुलींचा शेकडा निकाल 98.71 टक्के एवढा लागला आहे. यातून पुन्हा एकदा दहावीच्या निकालात मुलींनी वर्चस्व मिळवले आहे. यावर्षी तालुक्याचा निकाल समाधानकारक लागल्याचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी सांगितले.
तालुक्यातील एकूण 81 माध्यमिक शाळांमधून 2 हजार 474 मुले आणि 2 हजार 322 मुली अशी एकूण 4 हजार 796 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी 2 हजार 416 मुले व 2 हजार 292 मुली अशी एकूण 4 हजार 708 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 81 शाळांपैकी 47 शाळांचे निकाल 100 टक्के लागले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे.
सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांनी निकाल हा घरीच मोबाईल व संगणकावर पहिला तसेच फोनवरूनच एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. दुपारी 1.00 वाजता निकाल जाहीर होताच व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून अभिनंदनाचे संदेश पसरू लागले. विद्यार्थ्यांनी आपला आनंद हा मित्रांबरोबर, पालकांबरोबर साजरा केला.