पुणे – पैशासाठी पत्नीचा छळ करुन तोंडी तलाक दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायद्यानूसार हा गुन्हा समर्थ पोलिसांत नोंदवला गेला आहे. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यातच ही घटना घडली.
याप्रकरणी नाना पेठेत रहाणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार मुजायत अकबर अली खान, मुबारक बेगम सय्यद, फरीदखान, महमद अली अकबर अली खान (सर्व रा.वडनपल्ली, चेन्नई) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी महिला उच्चशिक्षीत आहे. तिचा जानेवारी महिन्यात मुजायत बरोबर श्रीलंकेत विवाह झाला होता. यानंतर तो फ्राॅन्समध्ये नोकरीसाठी गेला. ती साधारण महिनाभर चेन्नईमध्ये सासरच्या लोकांसोबत राहिली. या कालावधीत तिला पाच लाख रुपये आणि पाच तोळे सोने अशा हुंड्याची मागणी करण्यात आली.
हुंड्यासाठी तिला शिवीगाळ करुन दबाव टाकण्यात येत होता. तिला घरी असताना कसल्यातरी औषधाच्या गोळ्या जबरदस्तीने देऊन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. डॉक्टरांकडे नेल्यावर स्वत:हून गोळ्या खाल्या असल्याचे सांगण्यास भाग पाडले. तर तिच्या नणंदेच्या मुलाने ती आंघोळ करताना व कपडे बदलत असतानाचे फोटोही काढले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शिवराज हाळे करत आहेत.