पुणे – पैशाच्या वादातून एका हॉटेल व्यवसायीकावर चाकूने वार करत जबर मारहाण करण्यात आली. ही घटना हडपसर येथे सोमवारी रात्री सार्वजनिक रस्त्यावर घडली. याप्रकरणी तिघांविरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश चौधरी(30,रा.हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा हॉटेल व्यवसाय असून आरोपी त्यांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्यामध्ये पैशावरुन काही वाद झाले होते. या वादातूनच आरोपींनी स्विफ्ट कारमधून येऊन त्यांना रस्त्यात गाठले. यानंतर चाकूने पोटावर, छातीवर आणि गालावर वार केले. तसेच लाकडी दांडक्याने पाठिवर व डोक्यात मारहाण केली.
यातील एका आरोपीच्या पत्नीने फिर्यादीची आर्थिक व्यवहारातून बदनामी केली होती. त्याचा जाब फिर्यादीने विचारला होता. याचा राग मनात ठेऊन आरोपीने दोघा साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक मनोज पाटील करत आहेत.