पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दीपावलीच्या निमित्ताने “मनोगत कुलगुरूंचे” या आगळ्या वेगळ्या ऑडीओ – व्हिडिओ मालिकेची सुरुवात करण्यात येत आहे. यामध्ये कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे दर महिन्याला विद्यार्थ्यांना संबोधित करतील आणि विद्यापीठाशी संबंधित वेगवेगळ्या विषयाची सखोल माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवतील. अशी माहिती विदयापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या मालिकेतील पहिल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, त्याचे प्रसारण दीपावलीच्या पूर्वसंध्येला विद्यापीठाचे संकेतस्थळ, ईएमएमआरसी (EMMRC) चे संकेतस्थळ तसेच ईएमएमआरसीच्या फेसबुक पेजद्वारे केले जाणार आहे.
या कार्यक्रम मालिकेतून उच्च शिक्षणासाठी आखण्यात आलेल्या विविध योजना, सुविधा, अभ्यासक्रम, भविष्यातील संधी आणि आव्हाने, विद्यापीठातील घडामोडी इत्यादी बाबींचा आढावा घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रम मालिकेची निर्मिती विद्यापीठाचाच ईएमएमआरसी विभाग करणार असून, निर्मितीची जबाबदारी वरिष्ठ निर्माता विवेक नाबर पार पडतील, अशी माहिती ईएमएमआरसीचे प्रभारी संचालक प्रा. अरविंद शाळिग्राम यांनी दिली आहे.