ठेवीवरील व्याजदर महागाईच्या दरापेक्षा कमी
मुंबई – दोन वर्षापासून रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर कमी करण्याचे धोरण अवलंबिले आहे. रिझर्व्ह बॅंकेने रेपोदर कमी केल्यानंतर बॅंकांही कर्ज आणि ठेवीवरील व्याजदर कमी करीत आहेत. आता बऱ्याच ठेवींवरील व्याजदर महागाईच्या दरापेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बचत निरुपयोगी होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मार्च ते मेमध्ये बॅंकेने रेपो दरात 1.15 टक्क्यांची घट केली. त्या प्रमाणात व्यावसायिक बॅंकांनी कर्ज आणि ठेवीवरील व्याजदरात कपात करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे बॅंका निर्णय घेत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये किरकोळ किमतीवरील महागाईचा दर जून महिन्यांमध्ये 6.09 टक्के इतका मोजला गेला आहे. तर दुसरीकडे स्टेट बॅंकेच्या एक वर्षाच्या ठेवीवरील व्याजदर 5.10 टक्के आहेत.
म्हणजे महागाई दर व व्याजदरातील फरक जवळजवळ एक टक्क्याचा आहे. त्यामुळे बचत करून जमा केलेले पैसे कोठे ठेवावेत हा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होऊ शकतो.
पुरवठासाखळी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र, यामुळे महागाईच्या दरात आगामी काही काळ तरी वाढ होत राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये ठेवीवरील व्याज तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. चांगल्या पावसामुळे जर महागाई कमी झाली तर रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्या अवस्थेत ठेवीवरील व्याजदर व महागाईच्या दरातील फरक कायम राहण्याची शक्यता आहे. मागणी वाढावी व अर्थव्यवस्थेला चालना मिळावी या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बॅंक रेपोदरात कपात करीत आहे. मात्र या परिस्थितीत ठेवीवरील व्याजदर कमी राहतील. केंद्र सरकारने अल्पबचत योजनातील व्याजदरात या अगोदरच्या तिमाहीमध्ये बरीच घट केलेली आहे.