नारायणगाव -तीन वर्षांपूर्वी खेड पोलिसांवरील खुनी हल्ल्यातील फरार तिघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून सापळा रचून जेरबंद करण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली. रघुनाथ दामु वाघ (वय 45), संतोष रघुनाथ वाघ (वय 21), सखाराम दामु वाघ (वय 47, सर्व रा. विठ्ठलवाडी, शिरगाव, ता. खेड) असे जेरबंद करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
याबाबतची माहिती अशी की, हे तिघे जण गुरुवारी (दि. 16) पहाटेच्या सुमारास गावी आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला बातमीदाराकडून माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शंकर जम, सुनील जावळे, शरद बांबळे, पोलीस नाईक दीपक साबळे, अक्षय जावळे या पथकाने तात्काळ विठ्ठलवाडी येथे त्यांच्या राहते घरी जाऊन या तिघांना ताब्यात घेताना स्थानिकांचा होणारा विरोध गृहीत धरून व्यावसायिक कौशल्य वापरून पथकाने ताब्यात घेऊन खेड पोलिसांच्या स्वाधीन आहे.