Uday Kotak Networth – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गुरुवारी बरेच वाढले असले तरी खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरचा भाव काही काळ 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर गेला होता. दिवसाअखेरही या बँकेच्या शेअरचा भाव दहा टक्क्यापेक्षा जास्त कोसळला होता. त्यामुळे या बँकेच्या शेअरला काही काळ लोअर सर्किट लावावे लागले होते.
कोटक महिंद्रा बँकेचे मुख्य प्रवर्तक असलेले उदय कोटक यांच्याकडे या बँकेच्या एकूण भाग भांडवलापैकी 25.17% म्हणजे 51 कोटी इतके शेअर असल्याचे समजले जाते. आज एका दिवसात कोटक महिंद्रा बँकेच्या शेअरचा भाव 240 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे उदय कोटक यांच्याकडील शेअरची किंमत एका दिवसात 12,305 कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेली कोटक महिंद्रा बँक बँकिंग सेवाशिवाय इतरही वित्तीय उत्पादने ग्राहकांना पुरवत असते. या बँकेकडे 32 दशलक्ष एवढे ग्राहक आहेत. मात्र रिझर्व बॅंकेने ऑनलाइन पद्धतीने नवे ग्राहक घेण्यास या बँकेला परवानगी दिलेली नाही. यामुळे बँकेच्या मूळ कामकाजावर जास्त परिणाम होणार नसला तरी बँकेच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते.
आता कोटक महिंद्रा बँकेने आपल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात बँकेच्या व्यवस्थापनाने आपल्या कर्मचार्यांना पत्र पाठविले असल्याचे समजले जाते. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने याच कारणासाठी एचडीएफसी बँकेवर यापूर्वी अशीच कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या चौथ्या क्रमांकावरील कोटक महिंद्रा बँकेवर रिझर्व्ह बँकेने अशीच कारवाई केली आहे.
विशेष म्हणजे आम्ही अनेकदा सांगूनही या बँका मार्गदर्शक सूचनाचा अवलंब करत नाहीत, असे रिझव्हर्र् बँकेने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात इतर बँकांना आपल्या यंत्रणेत आणि कामकाजात सुधारणा करण्यासाठी गंभीर उपाय योजना करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे समजले जाते.
आरबीआयने काय माहिती दिली?
आरबीआयच्या माहितीनुसार 2022 आणि 2023 या वर्षांसाठी बँकेच्या माहिती तंत्रज्ञान (IT) ऑडिटमधून उद्भवलेल्या महत्त्वपूर्ण चिंतेमुळे आणि या समस्यांना वेळेवर आणि योग्य पद्धतीने हाताळण्यात बँकेच्या सतत अपयशामुळे हे पाऊल उचलणे आवश्यक होते. डिसेंबर 2020 मध्ये वारंवार तांत्रिक समस्यांमुळे आरबीआयने एचडीएफसी बँकेला नवीन कार्ड जारी करण्यास आणि नवीन डिजिटल उपक्रम सुरू करण्यास मनाई केली होती. मात्र मार्च 2022 मध्ये ही बंदी उठवण्यात आली.
कोटक महिंद्रा बँकेवरील कारवाईबाबत आरबीआयने सांगितले की, “आयटी डेटा व्यवस्थापन, वापरकर्ता ऍक्सेस व्यवस्थापन, विक्रेता जोखीम व्यवस्थापन, डेटा सुरक्षा आणि डेटा लीक प्रतिबंधक धोरण, व्यवसायातील सातत्य आणि रिकव्हरी प्रयत्न इत्यादींमध्ये गंभीर त्रुटी आणि गैर-अनुपालन आढळून आले.” अशा परिस्थितीत, कोटक महिंद्रा बँकेला तात्काळ प्रभावाने नवीन ग्राहक जोडणे आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतू बँक तिच्या विद्यमान ग्राहकांसह क्रेडिट कार्ड धारकांना सेवा देत राहील. RBI च्या पूर्व संमतीने बँकेने केले जाणारे सर्वसमावेशक बाह्य लेखापरीक्षण पूर्ण झाल्यावर या निर्बंधांचे पुनरावलोकन केले जाईल.