वडिलांनी माध्यमांसमोर मांडली व्यथा पोलिसांवर प्रश्नचिन्ह : एक महिन्याने गुन्हा दाखल
पिंपरी – मैत्री आणि विश्वासाची किंमत 21 वर्षांच्या तरुणीला स्वत:ला पेटवून घेत चुकवावी लागली. असह्य वेदना सहन करत तिने स्वत:ला संपविले; परंतु तिच्या कुटुंबाचा त्रास मात्र संपला नाही. तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या तरुणाने अटकपूर्व जामीन घेत आता तिच्या कुटुंबाला धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. तरुण मुलीच्या मृत्यूचे दु:ख सहन करत असलेल्या पित्याने पत्रकार परिषद घेत आम्हाला आरोपीपासून वाचवा आणि आमच्या मेलेल्या मुलीला न्याय मिळवून द्या, अशी आर्त विनवणी केली आहे.
एका 21 वर्षांच्या तरुणीला आधी मैत्रीच्या नावाखाली प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत फोटो काढले आणि चॅटींग केले. नंतर हेच फोटो आणि चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळले. तरीही त्रास देतच राहिला, अखेर त्या तरुणीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केली. तिने जाळून घेतल्यावर महिनाभर गुन्हाच दाखल झाला नाही. मिळालेल्या वेळेचा फायदा घेत आरोपीने अटकपूर्व जामीन घेतला. याशिका दीपक ओसवाल (वय 21, रा. तळेगाव दाभाडे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
याबाबत दीपक प्रकाशचंद ओसवाल यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विक्रांत पाटील (रा. वतननगर, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फोटो आणि चॅटींग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन विक्रांतने मित्र आणि मैत्रिणीच्या मदतीने याशिकाकडून अडीच लाख रुपये उकळले. याशिकाने पैसे देऊनही आरोपींची मागणी थांबली नाही. त्यांच्या त्रासाला कंटाळून याशिकाने 23 जानेवारी 2021 रोजी राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली.
वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी विक्रांत याला साथ देणाऱ्यांना आरोपी केले नाही. तसेच पैशाची मागणी करूनही खंडणीचे कलम लावले नाही. तसेच आरोपीला पुरेसा वेळ दिल्याने त्यास अटकपूर्व जामीन मिळाला. आरोपी विक्रांत आता आमच्या कुटुंबास धमकावत असल्याचा आरोप याशिका हिच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे विक्रांतचा मंजूर झालेला जामीन रद्द करून अटक व्हावी. आरोपींवर खंडणीचा देखील गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी मयत मुलीच्या पालकांनी केली आहे.