“पुनीत बालन स्टुडीओज’च्या वतीने निर्मिती
पुणे – ‘पुनीत बालन स्टुडीओज’निर्मित “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा केली. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त देवभूमी उत्तराखंड येथे झाला.
युवा उद्योजक आणि निर्माते पुनीत बालन यांच्या “पुनीत बालन स्टुडीओज’च्या वतीने या बिगबजेट चित्रपटाची घोषणा केली होती. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे संगीत असणाऱ्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे 90 टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार होते.
मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या निर्बंधामुळे परदेशात न जाता भारतातच चित्रीकरण करून “आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला अधिक बळ देण्याचा निश्चय निर्माते पुनीत बालन यांनी केला आहे. त्यामुळे आता युरोपातील “युके’ऐवजी भारतातील “युके’ अर्थात देवभूमी उत्तराखंडमध्ये “जग्गु आणि ज्युलिएट’चे चित्रीकरण होणार आहे.
पर्वणी आणि औत्स्युक्य
“जग्गु आणि ज्युलिएट’च्या निमित्ताने मराठी चित्रपटात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या आणि देवभूमी अशी ओळख असणाऱ्या उत्तराखंडातील प्रेक्षणीय स्थळे दिसणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक महेश लिमये यांच्या दिग्दर्शकीय “व्हिजन’बरोबरच त्यांच्या कॅमेऱ्याच्या नजरेतून देवभूमीचे बहरलेले सौंदर्य पाहणे ही प्रेक्षकांना मोठी पर्वणी ठरणार आहे.
‘मुळशी पॅटर्न’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर “पुनीत बालन स्टुडीओज’निर्मित “जग्गु आणि ज्युलिएट’बद्दल मराठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे. या “रॉमकॉम’ चित्रपटात कोणते कलाकार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याचे चित्रीकरण 2021 मध्ये पूर्ण होणार असून, त्यानंतर हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.