पुणे – ग्रामीणमधील करोना प्रतिबंधित लसीकरणाला गती मिळाली असून, पुणे जिल्ह्यातील ग्रामीणमध्ये 13 तालुक्यांमध्ये एकूण 54.84 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामध्ये मुळशी आणि वेल्हा तालुक्यांत लसीकरण सर्वाधिक झाले आहे, तर हवेली तालुक्यात सर्वांत कमी लसीकरण झाले आहे.
पुणे शहरात करोनाबाधित संख्या नियंत्रणात येत असताना, ग्रामीण भागातील बाधित संख्या अजूनही कमी होत झालेली नाही, तर करोनाची तिसरी लाट थोपवायची असेल, तर लसीकरणाचा वेग आणखी वाढवणे आवश्यक आहे.
ग्रामीणमधील 13 तालुक्यांत एकूण लसीकरण लाभार्थी संख्या 27 लाख 57 हजार 621 इतकी आहे. त्यामध्ये आतापर्यंत 11 लाख 89 हजार 427 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 3 लाख 22 हजार 708 लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस पूर्ण केला आहे. म्हणजे एकूण लाभार्थींच्या तुलनेत लसीचा पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 43.13 टक्के इतके आहे, तर दुसरा डोस पूर्ण केलेल्या नागरिकांचे प्रमाण केवळ 27.14 टक्के इतके आहे.
कोविशील्ड या लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढल्यामुळे दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी झाले आहे. दरम्यान, एकूण लाभार्थींच्या तुलनेत पहिला डोस घेणाऱ्यांमध्ये 15 लाख 40 हजार 492 लाभार्थी शिल्लक आहेत. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची शिल्लक लाभार्थी संख्या 8 लाख 66 हजार 719 इतकी आहे.