मुंबई – ऍक्शन हिरो म्हणून नाव कमावलेल्या रणवीर सिंगने आता छोट्या पडद्यावर पदार्पण करायचे ठरवले आहे. लवकरच तो कलर्स टीव्हीवर एक प्रश्नोत्तराचा एक कार्यक्रम सादर करणार आहे. त्यात तो स्पर्धकांना आडवे तिडवे प्रश्न विचारणार आहे.
“द बिग पिक्चर’ असे या क्वीझ शो चे नाव आहे. नेक्ट जनरेशनसाठी सामान्य ज्ञान आणि चातुर्याचा पाठ या कार्यक्रमातून दिला जाणार आहे. लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचा आराखडा आखलेला आहे. त्यातून लहान मुलांबरोबर लहोन झालेला रणवीर सिंग आपल्याला बघायला मिळणार आहे.
हिंदी सिनेमातून आपली अभिनयाची भूक भागवली जाते आहे. त्याचबरोबर आता टीव्हीवरूनही प्रेक्षकांशी संवाद साधणार आहे. हा आपल्यासाठी एक अनोखी संधी असणार आहे, त्यातून सर्वसामान्य प्रेक्षकांशी जोडले जाण्याची संधी मिळणार असल्याचे रणवीरने सांगितले.
लवकरच तो कबीर खान दिग्दर्शित “83’मध्ये क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त “सर्कस’मध्येही तो दिसणार आहे. या दोन्ही सिनेमांचे रखडलेले शूटिंग आता पुन्हा सुरू होते आहे. त्यातूनच वेळ काढून रणवीर सिंग या टीव्ही शोचे शूटिंग देखील करणार आहे.