अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण झाली सदाशिवगड पाणी योजना

पहिली चाचणी यशस्वी; लोकवर्गणीतून साकारलेली देशातील पहिली योजना

कराड – गडावर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने गडाखालून सुमारे दोन किलोमीटर पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेची सोमवारी सायंकाळी पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पडली. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकवगर्णीतून ही योजना हाती घेत अवघ्या सहा महिन्यांत ही योजना पूर्णही केली.

देशासह राज्यात सर्वप्रथम सदाशिवगड येथेच ही अभिनव योजना राबवण्यात आली असून याबाबत मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गतवर्षी आठ नोव्हेंबरला दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानने महत्त्वाकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेचे मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन केले होते. या योजनेसाठी बाबरमाची येथील शेतकरी जयवंत विठ्ठल मुळीक यांनी आपल्या विहिरीचे पाणी निःस्वार्थ भावनेने दिले असून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या योजनेसाठी मोठे परिश्रम घेतले आहेत.

आमदार बाळासाहेब पाटील, गजानन हौसिंग सोसायटी ट्रस्टचे अध्यक्ष एच. के. राव, डॉ. धनंजय चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी राजश्री चव्हाण, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कराड अर्बंन बॅंकेंचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सदाशिवगड भ्रमण मंडळाचे वसंतराव खंडेलवाल यांच्यासह हजारमाची, राजमाची, वनवासमाची, बाबरमाची या गावांसह कराड तालुक्‍यासह परिसरातील सदाशिवगड प्रेमी नागरिक, व्यापारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, यांनी या योजनेसाठी सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानला सढळ हाताने मोठी आर्थिक मदत केली आहे.

याच गडप्रेमींच्या सहकार्यामुळे सहा महिन्यात पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पहिल्या चाचणीसाठी मोटर सुरू करण्यात आली आणि त्यानंतरच्या दहा मिनिटांत गडावर पुरातन महादेव मंदिरासमोर असणाऱ्या विहिरीत पाइपलाइनद्वारे पाणी पडले. त्यानंतर मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 19 तास सलगपणे मोटर सुरू ठेवण्यात आली. त्यामुळेच महत्त्वाकांक्षी सदाशिवगड पाणी योजनेची पहिली चाचणी यशस्वी ठरली असून आता सदाशिवगड पर्यटनासह विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.