‘नीट’ परीक्षेत महाराष्ट्रात सार्थक भट पहिला

देशात सहावा क्रमांक : राजस्थानचा नलिन खंडेलवाल देशात अव्वल


सांगलीच्या साईराज माने द्वितीय, जुन्नरचा सिद्धांत दाते राज्यात तृतीय

पुणे – वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नॅशनल एलिजिबीलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत राजस्थानच्या नलिन खंडेलवालने 720 पैकी 701 गुण मिळवित देशात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. महाराष्ट्रात नाशिकच्या सार्थक भट याने 695 गुण मिळवित राज्यात पहिला, तर देशात सहावा क्रमांक पटकाविला आहे.

एमबीबीएस, बीडीएस व विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देश पातळीवर नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशात 5 व 20 मे 2019 रोजी “नीट’ परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 15 लाख 19 हजार 375 विद्यार्थ्यांनी अर्जांची नोंदणी केली होती. त्यातील 14 लाख 10 हजार 755 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते व 1 लाख 8 हजार 620 विद्यार्थी गैरहजर होते. देशातील 154 शहरामधील 2 हजार 546 केंद्रावर 11 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

या परीक्षेत एकूण 7 लाख 97 हजार 42 विद्यार्थी उत्तीणे झाले आहेत. यात मुलांची संख्या 3 लाख 51 हजार 278, तर मुलींची संख्या 4 लाख 45 हजार 761 एवढी आहे. देशाचा एकूण निकाल हा 56.50 टक्के लागला आहे. गेल्या वर्षी तो 56.27 टक्के एवढा होता. यंदा देशात दिल्ली राज्याचा निकाल हा सर्वात जास्त 74.92 टक्के लागला आहे. तर सर्वात नागालॅंड राज्याचा सर्वात कमी 34.52 टक्के निकाल लागला आहे.देशात दिल्लीच्या भाविक बंसलने 700 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तसेच उत्तरप्रदेशच्या अक्षत कौशिकने 700 गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला आहे. मुलींमध्ये तेलंगणाच्या माधुरी रेड्डी हिने 695 गुण मिळवित पहिला क्रमांक मिळविला आहे. तर देशात तिचा सातवा क्रमांक आला आहे.

देशात पहिल्या 50 टॉपरमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रात सार्थक भट याने प्रथम क्रमांक मिळवित देशात सहावा क्रमांक पटकाविला आहे. सांगलीच्या साईराज माने याने 686 गुण मिळवत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा व देशात 34 व्या क्रमांकाचा मान मिळविला आहे. जून्नरच्या सिद्धांत दाते याला 685 गुण िंमळाले असून हा राज्यात तिसरा आला आहे. तर दाते याने देशात 50 व्या क्रमांकाचे स्थान पटकाविले आहे.

दिव्यांगांच्या प्रवर्गात देशातील 5 हजार 411 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्जांची नोंदणी केली होती. त्यातील 4 हजार 953 विद्यार्थी परीक्षा हजर राहिले होते, तर 458 गैरहजर होते. यातील 2 हजार 186 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींमध्ये उत्तरप्रदेशच्या सभ्यता सिंग कुशवाला हिने 610 गुण मिळवित प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे. मुलांमध्ये राजस्थानच्या बहेराराम याने 604 गुण मिळवित प्रथक क्रमांक पटकाविला आहे.

सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे “नीट’ परीक्षेचा निकाल बुधवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल पाहता आला. मात्र, त्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.