साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच राखणार

शरद पवार यांची प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट ग्वाही

साताऱ्याचा उमेदवार लवकरच ठरवणार

सातारा विधानसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. आत्ताच तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे साताऱ्याची जागा चांगल्या पद्धतीने लढवून आम्ही ही जागा जिंकू असा विश्‍वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

सातारा – मतदारसंघातील कामे होत नाहीत म्हणून आमदारकीचा राजीनामा देऊन लोक भाजपमध्ये जात आहेत. मात्र जाणाऱ्यांसाठी आमच्या शुभेच्छा आहेत. तीन आमदारांनी जाणे ही भाजपची काही मेगाभरती नव्हे, साताऱ्याची जागा राखण्यात राष्ट्रवादीला अडचण येणार नाही, माझ्याकडे त्याकरिता तीन अर्जही आल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, सत्ता नसल्यामुळे लोकप्रतिनिधींची कामे होत नाहीत हे वाईट आहे. याचा अर्थ सत्ताधारी विरोधकांशी सुडबुद्धीने वागतात असा निष्कर्ष निघतो, अशी कोपरखळी सुद्धा पक्षांतर करणाऱ्यांना त्यांनी मारली. सातारा येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने आणि संस्काराने सुरु झालेल्या राज्यकारभाराला एकोणसाठ वर्ष झाली. ज्यांनी हा विचार स्वीकारून काम सुरू केले त्यांना थोडाफार त्रास होईल. पण, ज्यांची नाळ मातीशी आणि कार्यकर्त्यांशी जोडलेली आहे. ते इतरत्र जाणार नाहीत.

राज्यात मनोहर जोशी आणि नारायण राणे यांनीही मुख्यमंत्री म्हणून काम केले. पण, त्यांनी अशाप्रकारे लोकप्रतिनिधींची कामे करायचीच नाहीत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास द्यायचा असे काम कधीच केले नाही. सध्याचे सत्ताधारी हे विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींशी सुडबुद्धीने वागत आहेत. तो त्रास ज्यांना सहन होत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत.

साताऱ्यात खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात बोलणी करून द्यावी अशी अपेक्षा शिवेंद्रसिंहराजेंनी व्यक्त केली होती. त्यांना अधिवेशनानंतर चर्चा करू असे म्हटले होते. पण, तोपर्यंत ते थांबले नाहीत, असे स्पष्ट करून पवार पुढे म्हणाले, मला तर त्यांनी राष्ट्रवादी सोबतच असल्याचे सांगितले होते. त्यांच्या काही स्थानिक अडचणी होत्या. खासदार उदयनराजे यांच्याबरोबर बैठक घेण्याचा आमचा शब्द होता मात्र तत्पूर्वीच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. गेल्या पंधरा वर्षांपासून खासदार उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमच्यासोबत आहेत. अचानक शिवेंद्रराजे असा निर्णय घेतील याची कल्पना नव्हती.

पवार पुढे म्हणाले, इव्हीएम मशीनबाबत निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. याबाबत दिल्लीत बैठक झाली. भाजप व शिवसेना सोडून सर्व पक्षांचे नेते एकत्रित आले आहेत. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले आहे. आम्ही जनमत तयार करण्यासाठी 9 ऑगस्टला मुंबईत कार्यक्रम घेत आहोत. तर 16 ते 17 ऑगस्ट दरम्यान सर्वपक्षांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तिहेरी तलाक विधेयकाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोध आहे. त्यामध्ये काही जाचक अटी आहेत. त्या वगळण्याबाबत आम्ही मत मांडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरताना शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, कवाडे गट यांना सोबत घेऊन जात आहे. त्याबरोबरच वंचित आघाडीसोबत चर्चा सुरू असल्याचे पवारांनी म्हटले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.