पिंपरी – अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर शहर व पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेला आरोपी तडीपारीच्या काळातही शहरात वास्तव्य करुन लूटमार करत होता. हिंजवडी पोलिसांनी काल मोबाईल चोरट्यांवर केलेल्या कारवाईत ही बाब उघड झाली असून पोलिसांनी तडीपार आरोपीसह एका चोरट्याला जेरबंद केले आहे.
पोलिसांनी या आरोपीला अटक केली असली तरी तडीपार केलेले सराईत आरोपीही शहरात राजरोसपणे वावरत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. सतीश साहेबराव सावंत (वय-30, रा. दुर्गा कॉलनी, थेरगाव) व एक वर्षासाठी तडीपार असलेला विकास संभाजी तनपुरे (वय-20, रा.जय गणेश कॉलनी, थेरगाव) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 75 हजार रुपये किंमतीचे 5 मोबाईल, 4 हजार रुपयाची रोख रक्कम व चाकू असा 79 हजार 50 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
हिंजवडी पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरीचे मोबाईल विकणारे दोन इसम वाकड येथील शनि मंदिराजवळ येणार आहेत. पोलिसांनी शनि मंदीराजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी यापूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 3 गुन्हे केल्याचे उघडकीस आले. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचे पाच मोबाईल रोख चार हजार रुपये व एक चाकू असा 79 हजार 50 रुपयाचा माल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरमेठ, विनायक ढाकणे, श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.