जिल्हाधिकारी श्वेता सिंघल – महसूल दिनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिका-यांचा गौरव
कऱ्हाड येथे महसूल विभागाच्या कार्यक्रमप्रसंगी जिल्ह्यात उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, पूनम मेहेता, कीर्ती नलवडे, हिम्मत खराडे, दादासाहेब कांबळे, रुपाली आवळे, मंजुषा मिसकर, स्नेहा किसवे, सोनिया भुये, वर्षा सिंगन, बी. एस. माने, अमरदीप वाकडे, अजित कुऱ्हाडे, युवराज काटे, बी. एम. गायकवाड यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सातारा – पुनर्वसन व मतदार नोंदणीमध्ये महसूलसह सर्व विभागातील अधिका-यांन चांगल्या पद्धतीने काम केले आहे. महसूल विभागाची खरी ताकद ही कर्मचारी आणि अधिकारी आहेत. त्यांनी आपली कर्तव्य पार पाडत असताना एक नेतृत्व म्हणून काम करावे. सातारा जिल्ह्यात प्रशासनातील महत्वाचा विभाग म्हणून महसूल विभागाची ओळख आहे. या विभागातून वर्षभरात अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने कामे केली गेलेली आहेत.
महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनातील सर्व प्रशासकीय विभागाचा कणा आहे. अधिका-यांच्या चांगल्या कामामुळे प्रशासकीय कामात सातारा जिल्हा नंबरवनवर राहिला आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले. कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात गुरूवारी महसूल दिन कऱ्हाड महसूल उपविभागाच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विद्युत वरखेडकर, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे , निवृत्त नायब तहसीदार बी. एम. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साहेबराव गायकवाड म्हणाले, सातारा जिल्ह्यात पुनवर्सन विभागाच्यावतीने चांगले काम केले जात आहे. कोयनापासून ते मराठीवाडीपर्यंत अनेक बाधित, प्रकल्पग्रस्तांचे सुमारे वीस ते पंचवीस वर्षांपासून पुनवर्सनाचे प्रश्न मार्गी लावले जात आहेत. सध्या कोयनाचे संकलन तयार आहे. ते यावर्षी पूर्णत्वास नेले जाईल. प्रास्ताविक प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांनी केले. स्वागत तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले. आभार युवराज पाटील यांनी मानले.