कराड – पुणे बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे उभे असलेल्या ट्रकला चारचाकीने पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातामध्ये भाऊबहिणीसह भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील असून भाऊ नितीन पवार (रा. कोल्हापूर) पोलीस कर्मचारी आहेत. त्यांची बहीण मनीषा आप्पासाहेब जाधव आणि भाचा अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) अशी इतर दोन मृतांची नावे आहेत. अपघाताचे निश्चित कारण समजू शकले नाही.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूरहून कराडच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर पाचवड फाटा येथे भाग्यलक्ष्मी हॉटेलसमोर उभे असलेल्या आयशर ट्रकला पाठीमागून चारचाकी गाडीने जोरात दिली. या धडकेमध्ये चारचाकीचा चक्काचूर झाला.
गाडीतील तिघे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ट्रकला चारचाकी वॅगनार गाडीने धडक दिली. वॅगनार गाडीतून भाऊ, बहीण, भाचा पुण्याकडे निघाले होते. नितीन पवार आपल्या बहीण आणि भाच्याला सोडण्यासाठी जाताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कराड तालुका पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक जयकुमार उथळे, दस्तगीर आगा यांच्यासह वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक मोकळी केली.