वाई -महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून ट्विटर या समाजमाध्यमावर उद्या दि. 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते नऊ या वेळात वाचन प्रेरणा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ट्विटरसारख्या सामाजिक माध्यमावर महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्यात येणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असेल. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसाचे व वाचन प्रेरणा दिनाचे निमित्त साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात मराठी विश्वकोशाचे विद्याव्यासंगी डॉ. जगतानंद भटकर मराठी विश्वकोश परिचयाबरोबर प्रास्ताविक आणि भूमिका मांडणार आहेत. डॉ. शंतनू अभ्यंकर (वाई), शेखर जाधव (सिडनी, ऑस्ट्रेलिया), रश्मी मदनकर (नागपूर), प्रवीण कलंत्री (नाशिक) इत्यादी सुप्रसिद्ध लेखक, लेखिका आपले विचार या संमेलनात मांडतील. ट्विटर या माध्यमातून “द्वारा लेट्स रीड इंडिया’ व “पुस्तक आणि बरेच काही’ या संस्था वाचन संस्कृतीचा जगभर प्रचार करीत आहेत. या संस्थांचे सन्माननीय सदस्यही या संमेलनात सहभागी असतील.
या साहित्य संमेलनाची पत्रिका माध्यमांवर प्रकाशित करताचं तीस हजार लोकांनी या कार्यक्रमास प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या मराठी विश्वकोशाकडून आयोजित या संमेलनाची माध्यमांत चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, मराठी भाषा विभागाचे सचिव तुकाराम मुंढे आणि मराठी विश्वकोशाचे सचिव डॉ. शामकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई विश्वकोश कार्यालयातील संपादकीय विभाग व प्रशासकीय विभागाकडून या कार्यक्रमांचे संयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मराठी वाचक, विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्वकोश मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.