पुसेगाव – संतांची शिकवण हीच खरी शक्ती असून महाराष्ट्राच्या पावनभूमीत परोपकाराची, दया, क्षमा, शांती या मुल्यांची शिकवण देण्यामध्ये महाराष्ट्रातील संत परंपरेचे मोठे योगदान आहे. असे मत रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रिं. डॉ.ज्ञानदेव म्हस्के यांनी मांडले. पुसेगाव येथे प. पू. सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या ७६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री. तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे दहावा जिल्हास्तरीय खुला युवामहोत्सव आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिं.डॉ. ज्ञानदेव म्हस्के हे बोलत होते.
यावेळी सहसचिव( माध्यमिक विभाग) बी .,एम .पवार , मॅनेजिंग कौन्सिल सदस्य नवनाथजगदाळे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव , प्रिं. डॉ .सुरेश साळुंखे, प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र भोसले, युवा महोत्सव समितीचे सचिव प्रा. डॉ. संजय क्षीरसागर, प्राचार्य विजय गायकवाड ,मुख्याध्यापक, अशोक सावंत, रवींद्र जाधव, पुसेगावचे सरपंच घनशाम मसणे प्राचार्य सुधाकर माने, मुख्याध्यापिका सौ. हेमलता देशमुख उपस्थित होते.
डॉ. म्हस्के म्हणाले, “सेवागिरी महाराजांनी लोकांना दया, क्षमा, शांती, सत्य इत्यादी विचारांची शिकवण दिली. त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या अडअडचणीवर ,दुःखावर मात करण्यासाठी भक्तांच्या मनातील भावना जाणून त्यांना आशीर्वाद देऊन सगुण आणि गुरुभक्ती, सर्वभूती परमेश्वर, नामस्मरण, योग, ध्यानधारणा, इ. तसेच दत्त संप्रदायाच्या विचाराप्रमाणे त्रिगुणात्मक तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो म्हणजे गुरु होय हा विचार सांगितला. तसेच कला सादर करताना कलेच्या माध्यमातून मानवी संस्कृती, मानवी विचाराची, देवाण-घेवाण होत असते. कारण कलेतून मांडलेला अविष्कार हा पुढील पिढीपर्यंत पोहोचवता येतो. असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री सुंदरगिरी महाराज म्हणाले, ‘ सेवागिरी महाराज हे रजपूत घराण्यातील होते. स्वभावाने निरिच्छ् व वृत्तीने त्यागी, प्रेमळ होते. आज सेवागिरी महाराजांची भक्ती करणाऱ्यांची संख्या वाढत असताना दिसते. एकंदरीत सेवागिरी महाराजांचे जीवन पवित्र, निर्मळ ,होते. गीतेतील तत्त्वज्ञानाचा उपदेश सर्व भक्तांना सांगण्याचे महान कार्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. रणधीर जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्रा. महेश आवळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष वाघ यांनी आभार मानले. युवा महोत्सवासाठी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून कलाकाराचे संघ कला सादर करण्यासाठी आले होते. पुसेगाव, पुसेगाव पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.