पिंपरी – केंद्र शासनाने ट्रक आणि टँकरचालकांबाबत नवीन कायदा केला आहे. त्याला विरोध करण्यासाठी ट्रक आणि टँकरचालकांनी स्टिअरिंग छोडो आंदोलन केले. त्याचा दळण वळणावर विपरित परिणाम झाला. या संपाचाच एक भाग म्हणूनपिंपरी चिंचवड शहरात गॅस एजन्सीकडे येणार्या गाड्या वेळेत न पोहोचल्याने सध्या शहरातील बहुतांश नागरिकांना गॅससाठी वेटिंग करावे लागत आहे.
शहरातील तिन्ही कंपन्यांच्या एजन्सीच्या ग्राहकांना पाच ते आठ दिवस वेटिंगवर टाकण्यात आले आहे. एजन्सीवर गॅस सिलिंडर घेऊन गेलेल्या अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. मात्र, गॅसची कमतरता नसून सर्व सुरळीत असल्याचा दावा गॅस पुरवठा करणार्या एचपी, भारत आणि इंडेन या तिन्ही कंपन्यांचे मालक करत आहेत. ग्राहकांना बुकिंगनंतर 48 तासांच्या आता घरपोच गॅस सिलिंडर मिळायला हवा. त्यानुसार सेवा देणे प्रत्येक कंपनीचे व त्यांनी नेमलेल्या एजन्सी व वितरकांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. मात्र, ‘हिट अँड रन’ कायद्यातील जाचक तरतुदींविरोधात वाहनचालकांनी 1 ते 3 जानेवारीदरम्यान संप पुकारला होता. त्यामुळे पेट्रोल-डिझेलबरोबरच गॅसपुरवठ्यावरही परिणाम झाला. या तीन दिवसांत गॅसची बुकिंग झाली. त्यांना वेळेत गॅस देता आला नाही. तसेच दररोजची बुकिंग वाढत गेली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश गॅस सिलिंडरधारकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
बंद काळात गॅसच्या गाड्या न आल्याने आणि बुकिंग वाढत गेल्याने गॅस वितरकांना नियोजन करणे कठीण होत आहे. शाहूनगर येथे असलेल्या शहीद गॅस एजन्सीच्या ग्राहकांनी 5 जानेवारीला बूक केलेला गॅस 12 जानेवारीला मिळाला. साधारण आठ दिवसांनी गॅस मिळाल्यामुळे ग्राहकांमध्ये संबंधित यंत्रणेविषयी नाराजीचा सूर उमटत आहे.
गॅससाठी ग्राहक एजन्सीच्या दारात
गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर दोन तीन दिवसांनीही मिळत नसल्याने ग्राहक थेट सिलिंडर घेऊन एजन्सीच्या दारात जात आहेत. परंतु सिलिंडर पुरेसे उपलब्ध नसल्याने बहुतांश ग्राहकांना रिकाम्या हाताने मागे येण्याची वेळ आली.
सर्वसामान्यांच्या घरातील गृहिणींचे हाल
चिखली, कुदळवाडी, मोरेवस्ती आदी परिसरात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. बर्याच घरांमध्ये गॅसचे एकच कनेक्शन आहे. डबल टाकी नाही. त्यामुळे गॅस संपल्यानंतरच बुक करावा लागत आहे. परंतु सिलिंडर बुक केल्यानंतर लगेच मिळत असल्याने त्यांची गैरसोय होत नाही. पण वाहनचालकांच्या संपामुळे गॅसपुरवठा सुरळीत न झाल्याने सर्वसामान्यांच्या घरातील गृहिणींचे हाल झाले. बर्याच कुटुंबातील महिलांनी ज्यांच्याकडे दोन टाक्या आहेत त्यांच्याकडून गॅस उसणवारी आणून आपले काम चालवले.
मी 5 जानेवारीला ऑनलाइन गॅस सिलिंडर बुक केला होता. परंतु शुक्रवारी (दि. 12) गॅस सिलिंडर घरी आला. गॅस वितरकांशी बोलले असता वाहनचालकांचा संप झाल्याने गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्याने गॅस सिलिंडर वेटिंगवर आहेत. त्यामुळे बुकिंगनुसार वितरण करण्याचे काम सुरू आहे.
– अश्विनी जमदाडे, चिखली.
वाहनचालकांच्या संपाचा पिंपरी चिंचवडमधील गॅस सिलिंडर पुरवठ्यावर फारसा परिणाम झाला नाही. ज्या एजन्सीकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांनी रिस्क घेऊन आपल्या ग्राहकांसाठी गॅस सिलिंडरचा पुरवठा केला आहे. परंतु काही एजन्सीकडे व्यवस्था नसल्याने त्यांच्याकडे गॅसचा तुटवडा जाणवत असेल.
– मानव कांबळे, आम्रपाली गॅस एजन्सी, चिंचवड गाव.