वाहतुकीची ऐशीतैशी; सावज शोधण्यावर भर, पोलिसांनीच बसवले नियम धाब्यावर
कराड – शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी सावज शोधण्यात येथील वाहतूक पोलीस धन्यता मानत आहेत. आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसह अन्य वाहनांचेही जाणीवपूर्वक फोटो काढून त्यांच्यावर आर्थिक भार लादला जात असल्याचे दिसून येत आहे. याला सर्वसामान्य नागरिक वैतागले असून वाहतूक पोलिसांच्या या ‘टारगेट क्लिक’ची सध्या नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे, वाहतुकीला शिस्त लावणे, प्रसंगी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे आदी. वाहतूक पोलिसांची जबाबदारी आहे. परंतु, कराड शहरात सध्या या उलट परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक शाखेकडून याआधी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे यंत्रणेवर ताण येत असल्याची सबब सांगितली जात होती. मात्र, सध्या वाहतूक शाखेकडील कर्मचाऱ्यांची संख्या वाढूनही वाहतुकीला शिस्त लावण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शहरातील हेड पोस्ट, यशवंत हायस्कूल, कन्या शाळा परिसरात नेहमीच वाहतुकीचा बट्ट्याबोळ असतो.
घाटावर नदीपात्रात जागा असूनही याठिकाणच्या पार्किंगला शिस्त लागल्याचे दिसत नाही. तर पुणे-बेंगलोर महामार्गाच्या विस्तारीकरण कामामुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे निदर्शनास येते. काही कर्मचारी दिलेल्या ठिकाणावर हजेरी लावून त्यानंतर मलिदा मिळणाऱ्या ठिकाणी सावजाच्या शोधात उभे असल्याचे पहायला मिळते.
टार्गेट पूर्ण करण्याच्या नादात कामाकडे दुर्लक्ष होते. तसेच दुचाकी व चारचाकी गाडी अनावधानाने नो पार्किंगमध्ये लावल्याचे दिसतातच, तसेच गाडीचालक गाडीत बसलेला असताना जाणीवपूर्वक गाडीचे फोटो काढून त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड लादण्याचे प्रकार सर्रास चालू असतात. याउलट वाहतुकीच्या विविध सूचना व मार्गदर्शक चिन्हांच्या फलकांची मात्र शहरात वानवा असल्याचे दिसून येते.
सम-विषम पार्किंगचा भाग वगळता अन्यत्र वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतो. शहरातील अनेक गल्ल्यांसह रस्त्यांवर काही गाड्या कायमस्वरूपी उभ्या आहेत. यावर वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाने समन्वय साधून कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतु, तसे होताना दिसत नाही. त्याचबरोबर शहरातील सिग्नल यंत्रणा व्हेंटिलेटरवर असून यातील अर्धे सिग्नल बहुतांश वेळा बंद असल्याचे दिसते. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडते. तसेच काही सिग्नलवर झाडांच्या फांद्या आल्याने वाहनधारकांना सिग्नल दिसत नाहीत. सिग्नल न दिसल्याने जंप झाल्यास वाहतूक कर्मचारी संबंधिताच्या खिशाला कात्री लावण्यातच धन्यता मानतात. तसेच रिक्षा व वडापच्या वाहनांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात असून त्यांच्यामुळेच शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहायला मिळते.
“बुकबुक’ दादाची दहशत
कराड वाहतूक शाखेतील एका “बुकबुक’ दादाची शहरात मोठी दहशत आहे. या महाशयांचे जाणीवपूर्वक काही गाड्यांना टार्गेट करत गाडीचे त्यांचे फोटो काढून वाहनधारकांनाकडून मलिदा गोळा करणे, त्यांना दमदाटी करणे, अरेरावेची भाषा वापरणे, असे उद्योग सुरू असतात. “बुकबुक’ गाडीवान हे त्यांचे ठरलेले सावज. यांमुळे अनेकजण त्याच्या रोजच्याच किरकिरीला वैतागले असून शहर वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांमध्येही त्याच्याबाबत कुरकुर असल्याची चर्चा आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. तसेच चुकीच्या कारवाईबाबत वाहनधारकांना ऑनलाईन तक्रारही नोंदवता येते. कारवाईबाबत कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे टार्गेट देण्यात येत नाही. परंतु, चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्यास त्याबाबत सक्त सूचना देण्यात येतील.
– चेतन मछले,
(सपोनि, वाहतूक शाखा, कराड शहर)