पुणे – कंपनी सेक्रेटरी परीक्षेची काठिण्य पातळी आणि निकालाच्या टक्केवारीच्या लक्षात घेता सीएस अभ्यासक्रमाची चांगल्या पद्धतीने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक सुविधा मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (आयसीएसआय) नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे सीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना येत्या 1 डिसेंबरपासून नि:शुल्क स्वरुपात ऑनलाइन क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा “आयसीएसआय’ केली आहे.
नवीन कंपनी कायद्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुण्यात कार्यशाळेसाठी आलेल्या “आयसीएसआय’चे अध्यक्ष मनीष गुप्ता यांनी संस्थेच्या नवोपक्रमाची माहिती दिली. यावेळी “आयसीएसआय’चे बी. नरसिम्हन, पवन चांडक, अमृता नौटियाल, विशाल पाटील, संदीप कुलकर्णी यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कंपनी सचिव (सीएस) अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याची पहिली परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे ते म्हणाले.
सीएस परीक्षेचा निकाल दरवर्षी 25 टक्क्यांच्या आसपास लागतो. सीएस अभ्यासक्रमाची गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी परीक्षेची काठिण्य पातळी तितकीच असते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना सीएस उत्तीर्ण होणे कठीण होते. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कोचिंग क्लासेस सुरू केले जाणार आहे. तेही मोफत असणार आहे. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही या क्लासेसच्या माध्यमातून अभ्यासाची तयारी करणे शक्य होणार आहे. हा अभूतपूर्व निर्णय म्हणावे लागेल, असेही गुप्ता यांनी सांगितले.
सीएस अभ्यासक्रमात कौशल्य विकास, रोजगारक्षमता आणि प्रावीण्यावर भर देण्यात आला असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, लवाद, कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) अशा अनेक नवीन महत्त्वाच्या विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यांचे शिक्षण घेतल्यावर विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत विविध विषयांचा लघू कालावधी अभ्यासक्रम करण्यासाठी दोनशेहून अधिक विद्यापीठांशी संस्थेने करार केला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असेही यांनी सांगितले.
जवानांच्या कुटुंबांसाठी विशेष उपक्रम
आयसीएसआयचा 55 वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने संरक्षण कर्मचारी, अग्निवीर आणि हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना सीएस अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी शुल्क माफ केले जाणार आहे. याशिवाय हुतात्मा जवानांच्या मुलींच्या शिक्षणासाठी अकरा लाख रुपये संरक्षण मंत्रालयाकडे प्रदान करण्यात आले आहेत, असेही मनीष गुप्ता म्हणाले.